अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा व कला स्पर्धेत सहभागी होण्याचे शासकीय कर्मचाऱ्यांना आवाहन
अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा व कला स्पर्धेत सहभागी होण्याचे शासकीय कर्मचाऱ्यांना आवाहन
रत्नागिरी, दि. ३० : केंद्रीय सिव्हील सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ, नवी दिल्ली यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या “अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा व कला स्पर्धा” मध्ये सहभागी होण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धा देशातील विविध राज्यांमध्ये केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या देखरेखीखाली आयोजित केल्या जातात. महाराष्ट्र शासनाचा अधिकृत संघ तयार करण्यासाठी निवड चाचण्या आणि प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, त्याची जबाबदारी सचिवालय जिमखाना, मुंबई यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
कोण सहभागी होऊ शकतात?
नियमित शासकीय सेवेत किमान सहा महिने पूर्ण केलेले कर्मचारी या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत.
स्पर्धेतील क्रीडा व कला प्रकार
स्पर्धेत टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केटबॉल, कॅरम, बुद्धिबळ, ॲथलेटिक्स, कबड्डी, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, कुस्ती, लॉन टेनिस, खो-खो, योगासने यांसह संगीत, नृत्य आणि लघुनाटक या कला प्रकारांचाही समावेश आहे.
अर्ज प्रक्रिया
इच्छुक कर्मचाऱ्यांनी प्रत्येक क्रीडा किंवा कला प्रकारासाठी स्वतंत्र विहित नमुन्यात अर्ज भरून तो कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुख यांच्या शिफारशीसह सादर करावा. अर्ज संबंधित स्पर्धेच्या तारखेपूर्वी व्यवस्थापक, सचिवालय जिमखाना, मुंबई यांच्याकडे टपालाद्वारे, प्रत्यक्ष किंवा ई-मेलद्वारे पाठविता येईल.
अर्ज कुठे मिळतील?
स्पर्धेसाठीचे विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, प्लॉट क्र. ओएस-१५, गिरजोळे एमआयडीसी, रत्नागिरी येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी ही माहिती आपल्या अधिनस्थ शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.