‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’चा संदेश; जलसंधारणासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
अलिबाग :
रायगड जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने अलिबाग बीच येथे **‘महा वॉकेथॉन २०२६ – वॉक फॉर वॉटर’**चे आयोजन करण्यात आले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ या संदेशाने झालेल्या या वॉकेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ या संदेशातून माती आणि पाण्याच्या संवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले. जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यात योगदान देणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
पाण्याची बचत, पावसाच्या पाण्याचे संधारण आणि उपलब्ध जलस्रोतांचे जतन करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. भविष्यातील पिढ्यांसाठी जलसुरक्षित रायगड घडविण्याचा निर्धार या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला.