अवैध उत्खनन विरोधातील तक्रारीचा सूड!

0
138
अवैध उत्खनन विरोधातील तक्रारीचा सूड!
अवैध उत्खनन विरोधातील तक्रारीचा सूड!

अवैध उत्खनन विरोधातील तक्रारीचा सूड!

तक्रारदाराच्या घराकडे जाणारा रस्ता डंपरभर माती टाकून अडविला

सावंतवाडी l प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथे अवैध वाळू व दगड-गोटे उत्खननाविरोधात तक्रार केल्याचा राग मनात धरून वाळू माफियांनी थेट तक्रारदारालाच लक्ष्य केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणारे श्रीकांत खोत यांच्या घराकडे व मालकीच्या जमिनीकडे जाणारा रस्ता डंपरभर माती टाकून पूर्णतः बंद करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सांगेली नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध उत्खननाबाबत श्रीकांत खोत, राजकुमार राऊळ यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित उत्खनन परवाने सादर करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले होते. मात्र उत्खनन करणाऱ्यांकडून कोणतेही वैध परवाने सादर होऊ शकले नाहीत. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांना सात दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
या प्रशासकीय कारवाईमुळे बिथरलेल्या अवैध उत्खनन व्यावसायिकांनी सूडबुद्धीने मंगळवारी रात्री श्रीकांत खोत यांच्या घराकडे जाणारा एकमेव रस्ता डंपरभर माती ओतून बंद केला. त्यामुळे खोत कुटुंबाचा घराबाहेर जाण्याचा मार्गच तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
रस्ता अडविल्याचे निदर्शनास येताच श्रीकांत खोत यांनी तात्काळ ‘१००’ क्रमांकावर पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. माती टाकणाऱ्या संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना पाचारण करण्यात आले. बुधवारी सकाळी पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी जाऊन सविस्तर पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
अवैध व्यवसायांविरोधात आवाज उठवणाऱ्या सामान्य नागरिकांना दहशतीने गप्प बसवण्याचा हा प्रकार लोकशाही मूल्यांवर घाला असल्याची तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. रस्ता अडवून प्रशासनालाच आव्हान देणाऱ्या वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे. सावंतवाडी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत असून अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
O

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here