आंदुर्ले गावातील महिलांनी श्रमदानातून उभारला वनराई बंधारा

0
107
आंदुर्ले गावातील महिलांनी श्रमदानातून उभारला वनराई बंधारा
आंदुर्ले गावातील महिलांनी श्रमदानातून उभारला वनराई बंधारा

आंदुर्ले गावातील महिलांनी श्रमदानातून उभारला वनराई बंधारा

आंदुर्ले | प्रतिनिधी
मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाअंतर्गत आंदुर्ले गावात जलसंधारणाच्या दृष्टीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. आंदुर्ले ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आणि गावातील महिलांच्या श्रमदानातून वनराई बंधारा उभारण्यात आला असून, या उपक्रमामुळे परिसरातील शेतीसाठी मोठा लाभ होणार आहे. या उपक्रमासाठी आंदुर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. अक्षय तेंडोलकर, उपसरपंच श्री. चंद्रकीसन मोर्ये तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ. सुप्रिया येरम यांनी विशेष पुढाकार घेतला. गुरुकृपा महिला स्वयं सहायता समूह, श्री देव ब्राह्मण महिला स्वयं सहायता समूह आणि श्री समर्थ कृपा महिला स्वयं सहायता समूहातील महिलांनी तसेच ग्रामस्थांनी या कामात सक्रिय सहभाग घेतला.
सुमारे २० महिलांनी श्रमदान करून हा वनराई बंधारा उभारला. विशेष म्हणजे हा संपूर्ण बंधारा कोणत्याही यंत्रसामग्रीशिवाय, पूर्णपणे श्रमदानातून साकारण्यात आला आहे. दरवर्षी आंदुर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने ‘पाणी अडवा–पाणी जिरवा’ ही वनराई बंधारे उभारणीची मोहीम राबविण्यात येते. यावर्षी या मोहिमेअंतर्गत पक्के व कच्चे असे एकूण २० वनराई बंधारे बांधण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने केला आहे. या वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरवले जाणार असून, शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. परिणामी भूजलपातळी वाढण्यासोबतच शेतकऱ्यांच्या शेतीला मोठा आधार मिळणार आहे. गावातील महिलांनी दाखवलेली जिद्द, श्रम आणि पर्यावरणाविषयीची जाणीव याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. महिलांच्या पुढाकाराने उभा राहिलेला हा वनराई बंधारा जलसंधारणासोबतच सामूहिक प्रयत्नांचे आदर्श उदाहरण ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here