आंबा फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी महाडीबीटीवर अर्ज करा

0
45
आंबा फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी महाडीबीटीवर अर्ज करा
आंबा फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी महाडीबीटीवर अर्ज करा

आंबा फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी महाडीबीटीवर अर्ज करा

प्रति हेक्टर २४ हजार रुपयांपर्यंत अनुदान

सिंधुदुर्ग, दि. — सन २०२६-२७ या वर्षात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत आंबा फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा महत्त्वपूर्ण घटक राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील जुन्या आंबा फळबागांची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
जुन्या व कमी उत्पन्न देणाऱ्या आंबा फळबागांचे पुनरुज्जीवन करून त्यांची फळधारणा क्षमता आणि उत्पादकता वाढविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत आंबा पिकाच्या जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रति हेक्टर ६० हजार रुपये खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल २४ हजार रुपये प्रति हेक्टर इतके अनुदान देण्यात येणार आहे. एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त २ हेक्टर क्षेत्रापर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित आंबा फळबागेतील झाडांचे वय किमान २० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. तसेच ज्या फळबागेचे पुनरुज्जीवन करावयाचे आहे, त्या बागेची नोंद ७/१२ उताऱ्यावर असणे बंधनकारक आहे.
यासाठी ७/१२ व ‘अ’ उतारा, आधार कार्डची छायाप्रत, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायाप्रत तसेच शेतकरी आयडी (Farmer ID) आवश्यक आहे.
इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ‘फलोत्पादन’ या घटकाखाली ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००-२३३-४००० वर संपर्क साधावा अथवा नजीकच्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
जिल्ह्यातील आंबा फळबाग धारक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या जुन्या बागांचे पुनरुज्जीवन करावे आणि उत्पादनवाढीसाठी शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here