‘आख्यानाचा थाट’ ऑगस्टमध्ये फक्त अमेरिकेत; महाराष्ट्रातील तिकीट विक्रीपासून सावध राहण्याचे आवाहन
मुंबई :
लोकप्रिय सांस्कृतिक प्रस्तुती ‘द फोक आख्यान – आख्यानाचा थाट’ याचा संपूर्ण संघ ऑगस्ट २०२६ मध्ये अमेरिका दौऱ्यावर असून, या कालावधीत हा कार्यक्रम भारतात किंवा महाराष्ट्रात कुठेही आयोजित करण्यात आलेला नाही, अशी महत्त्वाची सूचना आयोजकांनी दिली आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार, काही ठिकाणी महाराष्ट्रात ‘आख्यानाचा थाट’ या नावाने तिकीट विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणतेही तिकीट बुक करण्यापूर्वी कार्यक्रमाचे नाव, आयोजक आणि अधिकृत माहितीची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ऑगस्ट महिन्यात ‘द फोक आख्यान – युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका टूर २०२६’ अंतर्गत खालील शहरांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे :
८ ऑगस्ट – सिएटल (बीएमएम कन्व्हेन्शन)
९ ऑगस्ट – सॅन होजे
१५ ऑगस्ट – ह्यूस्टन
१६ ऑगस्ट – डॅलस
२२ ऑगस्ट – वॉशिंग्टन डी.सी.
२३ ऑगस्ट – न्यू जर्सी
तिकीट बुकिंगसाठी आयोजकांनी अधिकृत संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
ऑगस्ट महिन्यात संपूर्ण कलावंतांचा संघ अमेरिकेत असल्याने ‘आख्यानाचा थाट’चे कोणतेही अधिकृत सादरीकरण भारतात होणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी ही माहिती आपल्या मित्र-परिवारापर्यंत पोहोचवावी, जेणेकरून कोणाचाही गैरसमज होणार नाही आणि आर्थिक फसवणूक टाळता येईल, असेही आवाहन करण्यात आले आहे.