आडे गावचे सुपुत्र अद्वैत वायंगणकर यांना ‘ठाणे गौरव गुणीजन’ पुरस्कार
आडे गावचे सुपुत्र अद्वैत वायंगणकर यांना ‘ठाणे गौरव गुणीजन’ पुरस्कार
वास्तुविशारद, उद्योजक, राष्ट्रीय पदक विजेते जिम्नॅस्ट आणि राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय योगदानाची दखल
दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
दापोली तालुक्यातील आडे गावचे सुपुत्र आणि सध्या ठाणे येथे कार्यरत असलेले प्रसिद्ध वास्तुविशारद श्री. अद्वैत आशय वायंगणकर यांना ठाणे महानगरपालिकेच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘ठाणे गौरव गुणीजन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वास्तुविशारद म्हणून ठाणे शहरातील पुनर्विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य तसेच Artistic Gymnastics क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी आणि योगदानाची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार माननीय महापौर सौ. शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे, खासदार श्री. नरेशजी म्हस्के, आमदार श्री. रवींद्रजी फाटक, सभागृह नेते श्री. हणमंतजी जगदाळे, भाजपा गटनेते श्री. मुकेशजी मोकाशी, विरोधी पक्षनेते श्री. अशरफ शानू पठाण तसेच ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, नगरसेवक-नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
पुनर्विकास क्षेत्रात स्वतंत्र ओळख
अद्वैत वायंगणकर हे Advait Wayangankar & Associates | Parameter Designs या संस्थेचे संस्थापक आहेत. निवासी पुनर्विकास, वास्तुरचना, प्रकल्प नियोजन, तांत्रिक सल्ला आणि प्रकल्प अंमलबजावणी या क्षेत्रांत ते कार्यरत आहेत.
गेल्या चार वर्षांत त्यांच्या संस्थेने ठाणे शहरातील २० हून अधिक पुनर्विकास प्रकल्पांवर काम केले असून, त्यापैकी ७ हून अधिक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. पुनर्विकास प्रक्रियेतील तांत्रिक बाबी, वास्तुरचना, नियोजन आणि विविध घटकांमधील समन्वय साधत त्यांनी या क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
जिम्नॅस्टिक्समध्ये राष्ट्रीय स्तरावर ठसा
वास्तुशास्त्रासोबतच अद्वैत वायंगणकर यांनी Artistic Gymnastics क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी आंतरशालेय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय रौप्यपदक मिळवले आहे. तसेच २० हून अधिक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, ते राष्ट्रीय पदक विजेते जिम्नॅस्ट, राष्ट्रीय प्रशिक्षक आणि राज्यस्तरीय पंच म्हणून कार्यरत आहेत.
अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धांमध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. २०१७ मध्ये चंदीगड आणि २०१८ मध्ये कुरुक्षेत्र येथे झालेल्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. मुंबई विद्यापीठाच्या संघाकडून राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत कांस्यपदक मिळविण्यातही त्यांनी योगदान दिले आहे. याशिवाय अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जिम्नॅस्ट्सना प्रशिक्षण देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
युवा खेळाडू घडविण्यासाठी योगदान
अद्वैत वायंगणकर हे PRAVAITAM Sports Academy, ठाणे शी संलग्न असून, Toddler Gymnastics, Basic Gymnastics, Foundation Training तसेच युवा खेळाडूंच्या कौशल्यविकासासाठी कार्य करतात. लहान वयातील खेळाडूंमध्ये योग्य तांत्रिक पाया, शिस्त आणि क्रीडावृत्ती विकसित करण्यासाठी ते योगदान देत आहेत.
वास्तुकलेतील सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्यासोबतच क्रीडा क्षेत्रातून आत्मसात केलेली शिस्त, सातत्य, नेतृत्वगुण आणि संघभावना यांचा संगम त्यांच्या कार्यातून दिसून येतो.
वास्तुविशारद, उद्योजक, राष्ट्रीय पदक विजेते जिम्नॅस्ट, राष्ट्रीय प्रशिक्षक आणि राज्यस्तरीय पंच म्हणून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अद्वैत वायंगणकर यांच्या या सन्मानाबद्दल आडे गावासह दापोली आणि रत्नागिरी जिल्ह्यातूनही त्यांचे अभिनंदन होत आहे.