‘आदिशक्ती अभियानात’ रायगडच्या वडगाव ग्रामपंचायतीचा राज्यात प्रथम क्रमांक
‘आदिशक्ती अभियानात’ रायगडच्या वडगाव ग्रामपंचायतीचा राज्यात प्रथम क्रमांक
मुंबई, दि. २ :
राज्यातील महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘आदिशक्ती अभियानात’ रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून ‘आदिशक्ती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने राज्यात सन २०२५-२६ पासून ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या आधारे राज्य व जिल्हास्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये रायगड जिल्ह्यातील वडगाव ग्रामपंचायत (अलिबाग) प्रथम, येडेनिपाणी ग्रामपंचायत (वाळवा, सांगली) द्वितीय आणि कवठेनिपाणी ग्रामपंचायत (मिरज, सांगली) तृतीय क्रमांकावर राहिल्या.
कोकण विभागातील जिल्हास्तरीय पुरस्कारांमध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजेते ग्रामपंचायती :
🥇 प्रथम – किंजवडे ग्रामपंचायत, देवगड तालुका 🥈 द्वितीय – कळसुली ग्रामपंचायत, कणकवली तालुका 🥉 तृतीय – वेताळ बांबर्डे ग्रामपंचायत, कुडाळ तालुका
रत्नागिरी जिल्ह्यातील विजेते ग्रामपंचायती :
🥇 गोठणे-दोनिवडे (राजापूर) 🥈 नाचणे (रत्नागिरी) 🥉 खामशेत (गुहागर)
महिलांच्या सक्षमीकरणासाठी गावपातळीवर प्रभावी काम करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या या यशामुळे इतर ग्रामपंचायतींनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.