आरोंदा गावचा अमित निवजेकर तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार.
उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या प्रस्तावानुसार आरोंद्याचा सोनू उर्फ अमित दिवाकर निवजेकर (वय ३१, रा. आरोंदा) याला कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश मंजूर झाला.
पोलिसांनी हा आदेश तात्काळ अमलात आणून त्याला नोटीस बजावली. नंतर दोन पोलिसांच्या देखरेखीखाली त्याला गोवा राज्यातील नियोजित वास्तव्यस्थळी सुरक्षित पोहोचवले. तेथील स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये हजर करून तडीपार आदेशाची औपचारिक अंमलबजावणीही करण्यात आली.
निवजेकरवर मारामारीचे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत, तसेच नॉन-कॉग्निझेबल (एनसी) स्वरूपाच्या नोंदीही आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


