आरोग्य सेवांच्या गुणवत्तेसाठी समित्यांचे पुनरुज्जीवन आवश्यक – मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) : राज्यातील नागरिकांना अधिक परिणामकारक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. या संदर्भात आयोजित बैठकीत त्यांनी रुग्ण कल्याण समिती (RKS), जन आरोग्य समिती (JAS), महिला आरोग्य समिती (MAS) तसेच ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती (VHNSC) यांच्या कार्यक्षमतेवर भर देण्याचे सांगितले.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरवल्या जातात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांपर्यंत दर्जेदार सेवा पोहोचवण्यात या समित्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागात ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती (VHNSC) तर शहरी भागात महिला आरोग्य समिती (MAS) कार्यरत असून या समित्या स्वच्छता, पोषण, पाणीपुरवठा आणि प्राथमिक आरोग्य सेवा यासाठी काम करतात. तसेच जन आरोग्य समिती (JAS) आणि रुग्ण कल्याण समिती (RKS) या आरोग्य संस्थांमधील सेवा गुणवत्ता, रुग्णकेंद्रित सुविधा आणि निधीच्या पारदर्शक वापरावर देखरेख ठेवतात.
या सर्व समित्या अधिक सक्रिय व सक्षम करण्यासाठी राज्यभरात त्यांच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया राबविण्याची गरज असल्याचेही मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले.


