आशियाई ट्रॅम्पोलिंग स्पर्धेत कणकवलीच्या मंथन उकर्डेची चमक
आशियाई ट्रॅम्पोलिंग स्पर्धेत कणकवलीच्या मंथन उकर्डेची चमक
आशियात सहावे स्थान
कणकवली, प्रतिनिधी : हाँगकाँग येथे पार पडलेल्या आशियाई ट्रॅम्पोलिंग स्पर्धेत कणकवली तालुक्यातील १२ वर्षीय Manthan Parag Ukarde याने उल्लेखनीय कामगिरी करत सहावे स्थान पटकावले आहे. या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून भारतासाठीही ही अभिमानास्पद बाब ठरली आहे.
या स्पर्धेसाठी प्रत्येक वयोगटातून भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी केवळ दोन खेळाडूंची निवड करण्यात आली होती. १२ वर्षांखालील गटात कणकवलीच्या मंथन उकर्डेची निवड होणे आणि त्यानंतर आशियाई स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणे ही कौतुकास्पद बाब मानली जात आहे.
स्पर्धेनंतर भारतात परतल्यानंतर मंथन आणि त्याच्या कुटुंबीयांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्याच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले तसेच आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही मंथनने दमदार कामगिरी करावी, यासाठी त्याला प्रोत्साहन देण्यात आले असून आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
मंथनच्या या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा खेळाडूंना नवी प्रेरणा मिळणार असून क्रीडा क्षेत्रात मोठी स्वप्ने पाहण्याचा आत्मविश्वास वाढणार आहे. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.