आ. विक्रांतदादा पाटील यांची अभ्यास दौऱ्यासाठी निवड
पनवेल l प्रतिनिधी
पनवेलचे आमदार विक्रांतदादा पाटील यांची लंडन येथे आयोजित करण्यात आलेल्या आमदार अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याने पनवेल शहरासह त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्तम प्रशासकीय कामकाज, पारदर्शक प्रशासन व्यवस्था आणि जनताभिमुख नेतृत्व या विषयांवर आधारित या विशेष अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभ्यास दौऱ्यासाठी राज्यभरातून एकूण १४ आमदारांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये आमदार विक्रांतदादा पाटील यांचा समावेश आहे. परदेशातील प्रगत प्रशासन प्रणाली, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्य, नागरी सुविधा व्यवस्थापन आणि विकास आराखड्यांचा अभ्यास करण्याची संधी या दौऱ्यात मिळणार आहे. या अनुभवाचा उपयोग राज्यातील विकासकामे अधिक परिणामकारकपणे राबवण्यासाठी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
आमदार पाटील यांच्या निवडीमुळे पनवेल मतदारसंघाच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून पुढील काळात या अभ्यास दौऱ्यातून मिळालेल्या ज्ञानाचा लाभ स्थानिक प्रशासन व नागरिकांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


