इतिहास रचणारी अनाहत सिंग! भारताची पहिली जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियन
इतिहास रचणारी अनाहत सिंग! भारताची पहिली जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियन
कॅनडा : भारतीय स्क्वॅशसाठी अभिमानाचा क्षण ठरवत अनाहत सिंग हिने जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. हा किताब जिंकणारी ती भारतातील पहिली खेळाडू ठरली आहे.
मुलींच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात अनाहतने इजिप्तच्या रुकाया सालेमचा ११-३, ११-७, ११-९ अशा सरळ तीन गेममध्ये पराभव करत ३-० असा दिमाखदार विजय मिळवला. या ऐतिहासिक यशामुळे २००५ मध्ये जोशना चिनप्पाने मिळवलेल्या उपविजेतेपदापेक्षाही मोठी कामगिरी करत भारताच्या जागतिक ज्युनियर विजेतेपदाची दोन दशकांहून अधिक काळाची प्रतीक्षा संपुष्टात आली.
२००८ मध्ये जन्मलेल्या अनाहत सिंगच्या घरातच खेळाची परंपरा आहे. तिचे वडील गुरशरण सिंग आणि आई तानी वढेरा हे दोघेही फील्ड हॉकीपटू होते, तर तिचे काका टेनिस खेळाडू होते. ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिच्याकडून प्रेरणा घेत तिने सुरुवातीला बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. मात्र, काही स्पर्धांनंतर स्क्वॅशमध्येच आपले भविष्य असल्याची जाणीव झाल्याने तिने या खेळातच कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला.
वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी सर्वात तरुण खेळाडू म्हणून अनाहतने जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेतले होते. आता जागतिक ज्युनियर विजेतेपद पटकावून तिने भारतीय स्क्वॅशला नवी उंची मिळवून दिली आहे.
विजयानंतर भावना व्यक्त करताना अनाहत म्हणाली, “ज्युनियर खेळाडूसाठी ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. गेल्या चार वर्षांपासून मी यात खेळत होते, पण प्रत्येक वेळी उपांत्यपूर्व किंवा उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मी या स्पर्धेला माझ्यासाठी ‘शाप’ म्हणायचे. पण हे माझे ज्युनियरमधील शेवटचे वर्ष असल्याने मी शंभर टक्के प्रयत्न करण्याचा निर्धार केला होता. अखेर माझे स्वप्न पूर्ण झाले, याचा मला खूप आनंद आहे.”
अनाहतच्या या ऐतिहासिक यशामुळे भारतीय स्क्वॅशला नवी दिशा मिळाली असून भविष्यात जागतिक स्तरावर भारताच्या पदकांच्या आशा आणखी उंचावल्या आहेत.