इयत्ता ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू
१० एप्रिलपासून भाग-१ नोंदणीला प्रारंभ
पुणे (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनच्या शिक्षण संचालनालयामार्फत इयत्ता ११ वी (FYJC) प्रवेशासाठी शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्जाच्या भाग-१ भरण्याची सुविधा दि. १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना सुरुवातीला भाग-१ भरून नोंदणी करता येणार असून, भाग-२ भरण्याची सुविधा राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी या प्रक्रियेची नोंद घ्यावी आणि याची माहिती व्यापक स्वरूपात प्रसारित करावी, अशी विनंती शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.
प्रवेशासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करता येणार असून, संबंधित माहिती, अर्ज प्रक्रिया आणि मार्गदर्शक सूचना ऑनलाइन उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आल्यास हेल्पलाईन क्रमांक व ई-मेलद्वारे सहाय्य मिळणार आहे.
दरम्यान, ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सोयीस्कर पद्धतीने राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


