उपमुख्यमंत्री पवारांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
मुंबई l प्रतिनिधी
योगेश सावंत, उपाध्यक्ष, सोशल मीडिया सेल, राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सावर्डे दौऱ्यात वापरण्यात आलेल्या वाहनाबाबत गंभीर आरोप उपस्थित केले आहेत.
सावर्डे येथे झालेल्या दौऱ्यादरम्यान अनिकेत तटकरे यांनी स्वतः वाहन चालवत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रवास घडवला. मात्र संबंधित MH08AN5000 क्रमांकाची टोयोटा लँड क्रूझर ही गाडी सचिन पाकळे यांच्या नावावर नोंद असल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकळे यांच्या कारखान्यांवर टेरर फंडिंगच्या संशयावरून यापूर्वी अंमलबजावणी संचालनालय (ED) तसेच वन विभागाकडून धाडी टाकण्यात आल्याचेही सावंत यांनी नमूद केले आहे.
तसेच संबंधित वाहनावर महाराष्ट्र विधानसभेचा बेकायदेशीर लोगो लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वाहनावर ओव्हरस्पीड संदर्भात २६ चलने प्रलंबित असून सुमारे ४८ हजार रुपयांचा दंड बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय वाहनाची पीयूसी वैधता संपलेली असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षे संदर्भात या बाबी अत्यंत गंभीर असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. शासकीय चालकाला बाजूला करून अनिकेत तटकरे यांनी स्वतः वाहन चालविल्याचा उल्लेख करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या सर्व मुद्द्यांवर संबंधितांकडून स्पष्टीकरण देण्यात यावे, अशी मागणी योगेश सावंत यांनी केली असून प्रकरणाबाबत अधिकृत चौकशीची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली असून संबंधित आरोपांबाबत प्रशासनाने अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पुढे येत आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेशी निगडित कोणतीही बाब गांभीर्याने घेतली जावी आणि तथ्य परिस्थिती जनतेसमोर मांडली जावी, असेही सावंत यांनी म्हटले आहे.


