एमपीएससीच्या गुणवंत अपयशी उमेदवारांसाठी ‘निपुण सेतू’ उपक्रम

0
48
सिंधुदुर्गातील ३,६७४ शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध; पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण करावे
सिंधुदुर्गातील ३,६७४ शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध; पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण करावे

एमपीएससीच्या गुणवंत अपयशी उमेदवारांसाठी ‘निपुण सेतू’ उपक्रम

खासगी व सार्वजनिक क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी
मुंबई, दि. ५ जून : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध स्पर्धा परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही अंतिम निवड यादीत स्थान मिळवू न शकलेल्या गुणवंत उमेदवारांसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अशा उमेदवारांना खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागामार्फत ‘मैत्री २.०’ पोर्टल अंतर्गत ‘निपुण सेतू’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) ‘प्रतिभा सेतू’ या उपक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्रात हा उपक्रम राबविण्यात येणार असून, स्पर्धा परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या गुणवंत उमेदवारांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
स्पर्धा परीक्षांमध्ये मुलाखत, कौशल्य चाचणी किंवा शारीरिक चाचणी यांसारख्या अंतिम टप्प्यांपर्यंत मजल मारलेल्या अनेक उमेदवारांकडे उच्च शैक्षणिक पात्रता, विश्लेषण क्षमता, नेतृत्वगुण आणि प्रशासकीय कौशल्ये असतात. मात्र मर्यादित पदसंख्येमुळे त्यांना अंतिम निवड मिळत नाही. या सक्षम मनुष्यबळाचा उपयोग राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी व्हावा, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे.
या उपक्रमांतर्गत एमपीएससीच्या कोणत्याही परीक्षेतील अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांची माहिती त्यांच्या संमतीनंतर ‘निपुण सेतू’ पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे उद्योग, कंपन्या आणि विविध संस्थांना अशा गुणवंत उमेदवारांची निवड करणे सुलभ होणार आहे.
शासन निर्णयानंतर आयोजित होणाऱ्या सर्व एमपीएससी परीक्षांसाठी हा उपक्रम लागू राहणार असून, तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्यास मागील एका वर्षातील पात्र उमेदवारांची माहितीही पोर्टलवर समाविष्ट करण्यात येणार आहे.
राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या हजारो गुणवंत युवक-युवतींसाठी हा निर्णय रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारा ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here