एसटीच्या नव्या बसांना ‘राजमाता जिजाऊ’ असे नामकरण
शिवापुर (वार्ताहर)
राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासीसेवेत आणखी एक महत्त्वाची भर पडली असून, ३x२ आसन रचनेच्या ५५ नवीन एसटी बसेसचे नामकरण ‘राजमाता जिजाऊ’ असे करण्यात आले आहे. परिवहन मंत्री मा. श्री. प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा करत या बससेवेचे लोकार्पण केले.
या नव्या बसेस अधिक आरामदायी, प्रशस्त व प्रवासीस्नेही असून, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उपयुक्त ठरणार आहेत. राजमाता जिजाऊ यांच्या नावाने या बसेसचे नामकरण करून त्यांच्या आदर्श, त्याग आणि प्रेरणादायी कार्याला अभिवादन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे एसटीची सेवा अधिक आकर्षक होऊन प्रवाशांचा प्रवासाचा अनुभव सुखकर होईल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.
या बसेसमध्ये आरामदायी आसने, सुधारित सस्पेन्शन, प्रशस्त पायऱ्या, योग्य प्रकाशयोजना तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि वेळेवर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
राज्यातील विविध मार्गांवर या ‘राजमाता जिजाऊ’ बसेस टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असून, एसटी महामंडळाच्या सेवेला नवे रूप देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.


