एसटीच्या शाळेच्या सहलींना उत्स्फूर्त प्रतिसाद
नोव्हेंबर महिन्यात तब्बल २३४३ बसेस आरक्षित
मुंबई l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शाळेच्या सहलींसाठी दिल्या जाणाऱ्या विशेष बससेवेला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रातप सरनाईक यांच्या निर्देशानुसार School Picnic Special सेवा सुरू करण्यात आली होती. त्या उपक्रमाला मिळालेल्या उत्साहवर्धक प्रतिसादामुळे केवळ नोव्हेंबर महिन्यातच २३४३ एसटी बसेस विविध शाळांकडून सहलीसाठी आरक्षित झाल्याची माहिती जनसंपर्क विभागाने दिली.
एसटी महामंडळाच्या आकडेवारीनुसार, या आरक्षणातून कोटी ५५ लाख रुपयांचे महत्त्वपूर्ण उत्पन्न झाले. विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सहली सुरक्षित, सुटसुटीत आणि परवडणाऱ्या दरात पार पडाव्यात, या उद्देशाने एसटीने विशेष बस सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शालेय सहलींसाठी एसटीचे भाडे खास कमी ठेवण्यात आले असून, नवीन ताफ्यातील १००% फिटनेस बस उपलब्ध करून देण्याचा निर्णयही अंमलात आणला गेला आहे.
यामुळे राज्यातील कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील विविध भागांतील शाळांनी धार्मिक स्थळे, समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले आणि नैसर्गिक सौंदर्यस्थळांसाठी मोठ्या संख्येने सहली आयोजित केल्या. कोल्हापूर विभागाने सर्वाधिक—३७५ बसेस शाळांना उपलब्ध करून देत तब्बल कोटी ९८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. यानंतर सांंगली (१११ बसेस) आणि रत्नागिरी (१०९ बसेस) विभागांचा क्रमांक लागतो.
शालेय सहलींसाठी एसटीने उपलब्ध केलेल्या सुरक्षित आणि विश्वसनीय प्रवास पर्यायामुळे मागील वर्षांच्या तुलनेत यावर्षी सहलींची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात सहलींचा हंगाम अधिक वाढणार असल्याने बसेस आरक्षित करण्याचे शाळांना आवाहनही करण्यात आले आहे.
परिवहन मंत्री प्रातप सरनाईक यांनी सांगितले की, “शालेय सहलींसाठी दर्जेदार, सुरक्षित आणि परवडणाऱ्या बससेवा देणे ही आमची प्राथमिकता आहे. एसटीवरचा विश्वास वाढत असून, सर्व शाळांना वेळेत आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”


