कणकवलीत सत्तासंघर्षाचा थरार ;कणकवलीत नगराध्यक्षपदावर भाजपला धक्का

0
104
कणकवलीत सत्तासंघर्षाचा थरार कणकवलीत नगराध्यक्षपदावर भाजपला धक्का
कणकवलीत सत्तासंघर्षाचा थरार कणकवलीत नगराध्यक्षपदावर भाजपला धक्का

कणकवलीत सत्तासंघर्षाचा थरार ; कणकवलीत नगराध्यक्षपदावर भाजपला धक्का

, सावंतवाडी–वेंगुर्लेत भाजपची मुसंडी, मालवणमध्ये निलेश राणेंची बाजी

कणकवली –
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी देणारा सत्तासंघर्ष पाहायला मिळाला. नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत सर्वपक्षीय शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी भाजपचे उमेदवार समीर नलावडे यांचा १४५ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. मात्र, नगरसेवकपदाच्या १७ जागांपैकी भाजपला ९ जागा मिळाल्याने सभागृहात भाजपचे संख्याबळ जास्त राहिले, तर शहर विकास आघाडीला ८ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे कणकवलीत सत्तेचे गणित गुंतागुंतीचे झाले असून नगराध्यक्ष शहर विकास आघाडीचा आणि सभागृह भाजपच्या बहुमताचे असे दुहेरी चित्र निर्माण झाले आहे.
या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पालकमंत्री नितेश राणे आणि त्यांचेच बंधू, शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्यात झालेली थेट प्रतिष्ठेची लढाई. भाजपविरोधात ठाकरे शिवसेना, शिंदे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि मनसे अशा सर्वपक्षीय शहर विकास आघाडीने एकत्र येत कणकवलीत मोठे आव्हान उभे केले. या आघाडीच्या प्रचारात आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत मतदारांमध्ये ‘भय व भ्रष्टाचार मुक्त कणकवली’चा संदेश ठामपणे पोहोचवला. त्याचाच परिणाम म्हणून विकासाचा मुद्दा पुढे करणाऱ्या भाजपवर हा नारा अधिक प्रभावी ठरल्याचे निकालातून स्पष्ट झाले.
नगराध्यक्षपदाच्या निकालात संदेश पारकर यांना ५२४१ मते मिळाली, तर समीर नलावडे यांना ५०९६ मते मिळाली. लोकराज्य जनता पार्टीचे गणेशप्रसाद पारकर यांना १७५ मते, तर नोटाला ७२ मते पडली. २ डिसेंबर रोजी झालेल्या ७९.७१ टक्के मतदानाचा कल शेवटी संदेश पारकर यांच्या बाजूने झुकला.
या निवडणुकीत अनेक दिग्गजांना धक्के बसले. भाजपचे माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचा पराभव शहर विकास आघाडीचे जयेश धुमाळे यांनी केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. मात्र युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी विजय मिळवत आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले. प्रभागनिहाय निकाल पाहता भाजपचे राकेश राणे, प्रतीक्षा सावंत, स्वप्नील राणे, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे (सर्वाधिक मताधिक्य), मेघा सावंत, आर्या राणे, मनस्वी ठाणेकर आणि संजय कामतेकर विजयी झाले, तर शहर विकास आघाडीकडून जाई मुरकर, सुमेधा अंधारी, लुकेश कांबळे, दीपिका जाधव, जयेश धुमाळे, रुपेश नार्वेकर, संकेत नाईक आणि सुशांत नाईक विजयी ठरले.
दरम्यान, कणकवलीसह सिंधुदुर्गातील इतर नगरपालिकांचे निकालही तितकेच राजकीय संदेश देणारे ठरले. दीपक केसरकर यांचे बालेकिल्ले मानले जाणारे सावंतवाडी आणि वेंगुर्ले येथे भाजपने जोरदार मुसंडी मारत शिवसेनेला धक्का दिला. सावंतवाडीत भाजपने ११ जागांसह सत्ता मिळवली, तर वेंगुर्लेत भाजपचे दिलीप गिरप ४३० मतांनी नगराध्यक्षपदी विजयी झाले आणि २० पैकी १५ जागा भाजपकडे गेल्या. याउलट, आमदार निलेश राणे यांनी त्यांच्या मतदारसंघातील मालवणमध्ये शिवसेनेची सत्ता कायम राखत नगराध्यक्षपदही आपल्या पक्षाकडे खेचून आणले.
एकूणच, कणकवलीतील नगराध्यक्षपदाचा निकाल हा पालकमंत्री नितेश राणे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात बसलेला मोठा धक्का मानला जात आहे. तर निलेश राणे हे या निवडणुकीतील प्रभावी ‘किंगमेकर’ म्हणून पुढे आले आहेत. सिंधुदुर्गातील या निकालांमुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी ठरली असून, आगामी काळात सत्तासंघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here