करंजे येथे आदिवासी बांधवांचा गृहप्रवेश सोहळा उत्साहात

0
24
करंजे येथे आदिवासी बांधवांचा गृहप्रवेश सोहळा उत्साहात
करंजे येथे आदिवासी बांधवांचा गृहप्रवेश सोहळा उत्साहात

करंजे येथे आदिवासी बांधवांचा गृहप्रवेश सोहळा उत्साहात

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते घरांच्या चाव्यांचे वाटप

कणकवली : करंजे येथे प्रधानमंत्री जन मन योजना अंतर्गत आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या चार घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री तथा आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी लाभार्थी कुटुंबांना नव्या घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.
घरकुलांचे स्वप्न पूर्ण झाल्याने लाभार्थी आदिवासी कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव पाहायला मिळाले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्वतःच्या हक्काचे घर मिळाल्याने लाभार्थ्यांनी शासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील वंचित, दुर्लक्षित आणि आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘प्रधानमंत्री जन मन योजना’ प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकही आदिवासी कुटुंब घराविना राहू नये, यासाठी शासन कटिबद्ध असून प्रत्येक गरजूला हक्काचे घर मिळाले पाहिजे. ही घरे केवळ चार भिंती नसून सन्मानाने जगण्याचा अधिकार आहेत.”
प्रधानमंत्री जन मन योजनेंतर्गत दुर्गम व आदिवासी भागातील कुटुंबांना पक्की घरे, नळाद्वारे पाणीपुरवठा, वीज जोडणी, स्वच्छतागृह आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. करंजे येथील चारही घरकुलांचे बांधकाम दर्जेदार झाल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य तसेच पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here