कर्करोगाच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून भरीव मदत
रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड येथील ४२ वर्षीय मयूर चांदुरकर यांना रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर उपचारासाठी मोठ्या खर्चाचे संकट उभे राहिले होते. मात्र मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून वेळेवर मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे त्यांच्यावर आवश्यक उपचार होऊन त्यांनी या आजारावर यशस्वी मात केली.
मयूर चांदुरकर हे किरकोळ व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या ९-१० वर्षांपासून त्यांना किडनीसंबंधित आजाराचा त्रास होता. अलीकडे अचानक वजन घटणे व अशक्तपणा वाढल्याने त्यांनी तपासणी केली असता हिमोग्लोबिन अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले.
घरात वृद्ध आई-वडील, आजी, पत्नी आणि दोन मुलांची जबाबदारी असताना १५ ते १८ लाख रुपयांच्या उपचार खर्चाचा बोजा उचलणे त्यांच्यासाठी अशक्य होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलमार्फत मदतीसाठी अर्ज केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना तातडीने २ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. तसेच Tata Trusts यांच्या माध्यमातून १० लाख रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत मिळाली. या सहाय्यामुळे वेळेत उपचार सुरू होऊ शकले.
उपचारानंतर १६ एप्रिल २०२६ रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मिळालेल्या मदतीबद्दल चांदुरकर कुटुंबीयांनी मुख्यमंत्री व संबंधित यंत्रणांचे आभार मानले आहेत.
राज्यातील कोणताही रुग्ण उपचाराअभावी वंचित राहू नये यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी प्रभावीपणे कार्यरत असून, गरजू रुग्णांनी मदतीसाठी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


