बंगळुरू : Siddaramaiah यांनी राज्यातील १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे. हा निर्णय वाढत्या मोबाईल वापरामुळे मुलांवर होणारे नकारात्मक परिणाम रोखण्यासाठी घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
२०२६-२७ चा राज्य अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्र्यांनी ही महत्त्वाची घोषणा केली. लहान वयातील मुलांमध्ये मोबाईल आणि सोशल मीडिया वापर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यांच्या मानसिक व शैक्षणिक विकासावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता सरकारने व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर मर्यादा घालण्यासाठी विशेष धोरण तयार करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. यासाठी आवश्यक कायदेशीर आणि प्रशासकीय उपाययोजना करण्यात येणार आहेत.
सरकारच्या या प्रस्तावामुळे मुलांच्या आरोग्यदायी विकासासाठी मदत होईल, असा दावा करण्यात येत असला तरी या निर्णयाबाबत पुढील तपशील आणि अंमलबजावणीची प्रक्रिया लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.