कसाल येथे २२ नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा शिबिर; प्रमुख जिल्हा न्यायाधीशांकडून स्थळाची पाहणी

0
4
कसाल येथे २२ नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा शिबिर
कसाल येथे २२ नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा शिबिर

कसाल येथे २२ नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा शिबिर; प्रमुख जिल्हा न्यायाधीशांकडून स्थळाची पाहणी

कसाल, ता. कुडाळ :
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य कायदेविषयक सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाची जागा निश्चित करण्यात आली असून, २२ ऑक्टोबर रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध सोयी-सुविधांचा आढावा घेतला.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती श्याम चांडक आणि न्यायमूर्ती फरहान दुबाश यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्ह्यातील सर्व वकील संघ तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या (NALSA) नवीन मॉड्यूलनुसार शिबिराचे नियोजन करण्यात येत आहे.
या शिबिराच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कसाल येथील परिसराची सविस्तर पाहणी करण्यात आली. शिबिरासाठी आवश्यक असलेल्या विविध सोयी-सुविधांची तपासणी केल्यानंतर या ठिकाणाची निवड निश्चित करण्यात आली.
या पाहणीप्रसंगी जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली, कुडाळच्या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, जिल्हा परिषदेचे सहायक गटविकास अधिकारी (ग्रामपंचायत) परेश शिरसाट, मंडळ अधिकारी अशोक चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कनिष्ठ अभियंता शिकांत शिंदे उपस्थित होते.
तसेच जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक एम. आर. माणगांवकर, एस. डी. गिरकर, एन. एस. सावंत, सहायक अधीक्षक एस. एच. खेडेकर यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन अवधुत मालणकर, सेक्रेटरी आशिष परब आणि मुख्याध्यापक उत्तम मळगावकर यांनीही उपस्थित राहून पाहणीसाठी सहकार्य केले.
२२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या शिबिराच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत कायदेविषयक सेवा पोहोचविण्यासाठी विविध शासकीय यंत्रणा आणि विधी सेवा प्राधिकरण एकत्रितपणे काम करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here