“कामे अपूर्ण, तरीही बिले अदा?” – उपसरपंचांचाच सातुळी-बावळाट ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप

0
9
"कामे अपूर्ण, तरीही बिले अदा?" – उपसरपंचांचाच सातुळी-बावळाट ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप
"कामे अपूर्ण, तरीही बिले अदा?" – उपसरपंचांचाच सातुळी-बावळाट ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप

“कामे अपूर्ण, तरीही बिले अदा?” – उपसरपंचांचाच सातुळी-बावळाट ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप

⭐ स्ट्रीट लाईट व रस्ता डांबरीकरणाच्या कामांमध्ये कथित अनियमितता; गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

सावंतवाडी, दि. ४ जुलै : सावंतवाडी तालुक्यातील सातुळी-बावळाट ग्रामपंचायतीतील विकासकामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायतीचे उपसरपंच स्वप्निल सुभाष परब यांनी केला आहे. अपूर्ण कामांची बिले ठेकेदाराला अदा करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमुळे ग्रामपंचायतीच्या  कारभाराबाबत चर्चा सुरू झाली आहे.
तक्रारीनुसार, चिलेवाडी येथे स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामासाठी अंदाजपत्रकात १८ पोल मंजूर करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात केवळ ५ ते ६ पोल उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच स्ट्रीट लाईट कार्यान्वित झालेले नसतानाही संबंधित ठेकेदाराला बिलाची संपूर्ण रक्कम अदा करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
यासोबतच, या कामासंदर्भात मासिक सभेत कोणतीही चर्चा झाली नसल्याचा तसेच उपसरपंच आणि इतर सदस्यांना विश्वासात न घेता संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
बावळाट ते चिलेवाडी रस्ता डांबरीकरण व खडीकरणाच्या कामातही अनियमितता झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. कामाच्या फाईलमध्ये जोडलेली छायाचित्रे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणाची नसल्याचा आरोप करण्यात आला असून, मोजमाप पुस्तिका (एमबी) फाईलला जोडलेली नसतानाही बिल मंजूर करून ठेकेदाराला रक्कम अदा करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
उपसरपंच परब यांनी सरपंचांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विकासकामे, मोजमाप पुस्तिका, बिले आणि आर्थिक व्यवहार याबाबत मासिक सभेत सविस्तर चर्चा होत नसल्याने सदस्यांना आवश्यक माहिती मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच, ग्रामपंचायत मासिक सभेचा अजेंडा नियमानुसार सात दिवस आधी देणे अपेक्षित असताना तो केवळ एक-दोन दिवस आधी व्हॉट्सॲपद्वारे पाठविला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे सदस्यांना सभेची तयारी करता येत नसल्याने अनेकवेळा सभा तहकूब करण्याची वेळ येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी तसेच ग्रामपंचायतीचा कारभार अधिक पारदर्शक पद्धतीने चालविण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी उपसरपंच स्वप्निल परब यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
दरम्यान, या वृत्तातील सर्व आरोप हे उपसरपंच स्वप्निल परब यांनी केलेल्या लेखी तक्रारीवर आधारित आहेत. या आरोपांबाबत ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच किंवा संबंधित ठेकेदार यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यांची बाजू प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल. या प्रकरणातील वस्तुस्थिती शासकीय चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here