कालावल खाडीत ‘होडी आंदोलन’; वाळू उपशावरून तळाशील–रेवंडी ग्रामस्थ आमनेसामने, तणावपूर्ण वातावरण
मालवण (प्रतिनिधी):
कालावल खाडीतील अनधिकृत वाळू उपशाच्या मुद्द्यावरून तळाशील आणि रेवंडी ग्रामस्थांमध्ये तणाव निर्माण झाला असून तळाशील ग्रामस्थांनी थेट खाडीपात्रात उतरून ‘होडी आंदोलन’ छेडल्याने परिस्थिती चिघळली. रेवंडी जेटीसमोर चार ते पाच होड्यांमधून खाडीपात्रात बसून करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थ आमनेसामने आले होते.
या अचानक आंदोलनामुळे रेवंडी ग्रामस्थांनीही जेटीकडे धाव घेत विरोध दर्शविला. परिणामी काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन मालवणचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप आणि बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.
तळाशील ग्रामस्थांनी यापूर्वीच कालावल खाडीतील अनधिकृत वाळू उपशावर कारवाईची मागणी करत मालवणचे तहसीलदार गणेश लव्हे यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, तहसीलदार कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत कोणताही तोडगा निघाला नव्हता.
रेवंडी जेटीसमोरील खाडीपात्रातून होणाऱ्या वाळू उपशामुळे तळाशील गावाला धोका निर्माण होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका कायम ठेवली आहे. तसेच रेवंडीतील काही ग्रामस्थांनी मच्छिमारांना जेटीवर मासे वाहतूक व वाहन उभी करण्यास विरोध केल्याचा आरोपही तळाशील ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसायात अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर हिवाळे, ओवळीये आणि शिरखंडे परिसरातील क्रशर प्रकल्पांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे. चार गावांच्या संयुक्त बैठकीत या क्रशर प्रकल्पांना कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करत तहसीलदार गणेश लव्हे यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावर संबंधित विभागांकडे अहवाल सादर करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले आहे.
कालावल खाडीतील वाळू उपशाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा तळाशील ग्रामस्थांनी दिल्याने येत्या काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


