कुणबी पतपेढीकडून चंद्रनगर शाळेचा गौरव
दापोली l
शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद आयोजित नासा-इस्रो चाळणी परीक्षेत अव्वल यश संपादन करून नासा व इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा चंद्रनगर या शाळेतील कु. आरोही महेश मुलुख व कु. नीरजा मनोज वेदक या दोन विद्यार्थीनींची निवड झाल्याबद्दल दोन्ही मुलींचा दापोली येथील कुणबी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने चंद्रनगर शाळेत समारंभपूर्वक गौरव करण्यात आला.
दापोली येथील कुणबी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्रीधर जाधव, संचालक गजानन कांबळे, शरद गौरत, मंगेश वारसे, पतपेढीच्या मुख्य व्यवस्थापक विद्या म्हसकर, पतपेढी कर्मचारी सचिन भांबिड, चंद्रनगर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रुपेश बैकर, उपाध्यक्ष अनिल मुलुख, चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक आदी मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, प्रशस्तिपत्र, पुष्पगुच्छ देऊन हा गौरव करण्यात आला. विद्यार्थी गौरव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबू घाडीगांवकर, मानसी सावंत, रेखा ढमके यांनी केले.


