‘कुर्ला फेस्टिव्हल २०२६’ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासाची घोषणा
‘कुर्ला फेस्टिव्हल २०२६’ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासाची घोषणा
शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘कुर्ला फेस्टिव्हल २०२६’ ला मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थिती लावली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधत कुर्ला मतदारसंघातील विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही दिली.
गेल्या चार वर्षांपासून आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असून अल्पावधीतच लोकप्रिय ठरला आहे. सलग २४ दिवस विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करूनही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कायम राहणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरात नागरिकांना विरंगुळा, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि सामाजिक संवादाचे व्यासपीठ मिळणे आवश्यक असून, कुर्ला फेस्टिव्हल ही भूमिका प्रभावीपणे पार पाडत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. हा महोत्सव समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.
यावेळी नेहरूनगर, कुर्ला पूर्व येथील पोलीस वसाहतीतील १९ जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाची घोषणा करण्यात आली. सुमारे ५८० कुटुंबे वास्तव्यास असलेल्या या वसाहतीचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्यास शासन प्राधान्य देणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
यावेळी शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्यासह जय मंगेश कुडाळकर, विनोद कांबळे, शालिनीताई सुर्वे, उज्वला शहा, राजा चौगुले, कलाताई शिंदे, सगुन नाईक, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.