कोकण विभागीय आयुक्तपदी श्रीमती रुबल अग्रवाल विराजमान

0
86
कोकण विभागीय आयुक्तपदी श्रीमती रुबल अग्रवाल विराजमान
कोकण विभागीय आयुक्तपदी श्रीमती रुबल अग्रवाल विराजमान

कोकण विभागीय आयुक्तपदी श्रीमती रुबल अग्रवाल विराजमान

प्र.आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडून स्वीकारला पदभार.

प्रशासकीय क्षेत्रातील आपल्या धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सनदी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सोमवार, ३० मार्च २०२६ रोजी कोकण विभागीय आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली आहेत.

त्यांनी प्रभारी विभागीय आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडून या पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला.

२००८ च्या बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी असलेल्या रुबल अग्रवाल यांनी आपल्या कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर काम करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. यापूर्वी त्यांनी सोलापूर येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या सेवेला सुरुवात केली होती. त्यानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि अहमदनगर तसेच जळगाव येथे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी यशस्वी कामकाज पाहिले आहे.

श्रीमती रुबल अग्रवाल या शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. त्यांच्या काळात साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाचे नियोजन अत्यंत भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.

त्या पुणे महापालिकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी कोविड-२०१९ च्या भीषण संकटाचे व्यवस्थापन अत्यंत प्रभावीपणे केले. त्यांच्या या कामगिरीची दखल राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली होती.

यापूर्वी त्यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या (ICDS) आयुक्त म्हणून राज्यातील १ लाख १० हजार अंगणवाड्यांचे जाळे सक्षमपणे हाताळले आहे.

कोकण विभागीय आयुक्त पदावर येण्यापूर्वी त्या महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या.

श्रीमती रुबल अग्रवाल यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल त्यांना आतापर्यंत उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार (महाराष्ट्र शासन, २०१६-१७), महात्मा गांधी शांतता पुरस्कार (जळगावमध्ये कायदा व सुव्यवस्था राखल्याबद्दल), अरुण बोंगीरवार सार्वजनिक सेवा उत्कृष्टता पुरस्कार (पुणे शहरातील कोविड नियंत्रणासाठी), स्मार्ट सिटी डिजिटल पेमेंट आणि ई-गव्हर्नन्स पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

कोकण विभाग हा भौगोलिक आणि प्रशासकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा विभाग मानला जातो. या विभागातील महसूल प्रशासन, पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांत रुबल अग्रवाल यांच्या दांडग्या अनुभवाचा मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विभागातील कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून, जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याला आपले प्राधान्य असेल, असे त्या यावेळी म्हणाल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here