कोल्हापूर, दि. ३० : जिल्हाधिकारी कार्यालयात येत्या ६ जुलै (सोमवार) रोजी जिल्हाधिकारी लोकशाही दिन आयोजित करण्यात आला असून, हा कार्यक्रम महाराणी ताराराणी सभागृहात सकाळी ११.०० वाजता होणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी शासकीय व निमशासकीय कार्यालयांशी संबंधित आपल्या वैयक्तिक तक्रारी व निवेदने न्याय मिळविण्यासाठी स्वतः उपस्थित राहून विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.
लोकशाही दिनाचे आयोजन दर महिन्याला विविध स्तरांवर केले जाते. त्यानुसार तालुका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी, जिल्हाधिकारी/महानगरपालिका आयुक्त स्तरावर पहिल्या सोमवारी, विभागीय आयुक्त स्तरावर दुसऱ्या सोमवारी आणि मंत्रालय स्तरावर पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जातो.
अर्ज स्वीकृतीचे निकष
अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र १-अ ते १-ड) असावा.
तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे.
तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी/महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनात अर्ज करता येईल.
जिल्हाधिकारी लोकशाही दिनानंतर दोन महिन्यांनी विभागीय आयुक्त लोकशाही दिनात आणि त्यानंतर दोन महिन्यांनी मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज सादर करता येईल.
खालील प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
न्यायप्रविष्ट प्रकरणे
महसूल अपील प्रकरणे
सेवाविषयक व आस्थापना विषयक बाबी
विहित नमुन्यात नसलेले अथवा आवश्यक कागदपत्रांशिवाय सादर केलेले अर्ज
अंतिम उत्तर देण्यात आलेल्या किंवा त्याच विषयावर पुन्हा सादर करण्यात आलेल्या तक्रारी
लोकशाही दिनासाठी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नसल्याचे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.