क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई –
राज्य शासनाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीच्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पात्र व इच्छुक शिक्षकांना निर्धारित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पुरस्कारासाठी २७ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजल्यापासून ऑनलाइन नावनोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील इच्छुक शिक्षकांना अर्ज करता येणार आहे.
इच्छुक शिक्षकांनी १० जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
समर्पित वृत्तीने कार्य करणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्काराद्वारे शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा शासनाचा उद्देश आहे.
यासंदर्भातील माहिती शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.