खड्ड्यांमुळे खासगी बससेवा बंद, गणेशोत्सवात चाकरमान्यांची कोंडी होण्याची शक्यता
३५० कोटींच्या कामाची प्रतीक्षा, गणेशोत्सवापूर्वी तातडीच्या डागडुजीची मागणी
वैभववाडी : प्रतिनिधी :
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या तरेळे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील सांगशी ते कळे दरम्यानच्या सुमारे ३० किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रवासाचा वेळही दुप्पट झाला असून, वाहनांच्या नुकसानीमुळे या मार्गावरील खासगी आराम बससेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील वाहतूक व कनेक्टिव्हिटीवर मोठा परिणाम झाला आहे.
तरेळे-कोल्हापूर हा मार्ग २०२२ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर रस्त्याची सुधारणा होऊन कोकण-पश्चिम महाराष्ट्र प्रवास अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा होती. पहिल्या टप्प्यात तरेळे ते गगनबावडा दरम्यान सुमारे ३० किलोमीटर रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यापूर्वी कळे ते कोल्हापूर दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले होते. मात्र गगनबावडा, सांगशी ते कळे या शिल्लक भागाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
खड्ड्यांमुळे दीड तासांचा प्रवास दोन-अडीच तासांचा
यंदाच्या पावसाळ्यात या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला असून, साधारण एक ते दीड तासांत पूर्ण होणाऱ्या प्रवासासाठी आता दोन ते अडीच तासांचा कालावधी लागत आहे. खड्ड्यांमधून वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहनांचे टायर, सस्पेन्शन आणि इतर यंत्रणांचे नुकसान होत असल्याने वाहतूकदारांमध्येही नाराजी आहे.
या परिस्थितीमुळे खासगी आराम बससेवा बंद करण्यात आली असून, काही वाहतूक फोंडाघाट-राधानगरी मार्गे, तर काही वाहतूक मुंबई-गोवा महामार्गावरून वळविण्यात आली आहे. पर्यायी मार्गामुळे प्रवाशांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढत आहेत.
गणेशोत्सवात चाकरमान्यांची मोठी गैरसोय होण्याची भीती
१४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होतात. मुंबई-कोल्हापूर द्रुतगती मार्गाचा वापर करून पुढे कोकणात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते.
मात्र गगनबावडा ते कळे मार्गाची सध्याची दुरवस्था गणेशोत्सवाच्या काळातही कायम राहिल्यास हजारो प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागू शकतो. परिणामी प्रवासाचे अंतर, वेळ आणि खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी या महामार्गाची तातडीने डागडुजी करणे अत्यावश्यक असल्याची मागणी प्रवासी आणि वाहनचालकांकडून होत आहे.
३५० कोटींच्या कामाची प्रतीक्षा
या महामार्गाच्या रुंदीकरणासह काँक्रिटीकरणासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांचा निधी मंजूर असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र कायमस्वरूपी काम सुरू होण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत विद्यमान रस्ता वाहतुकीस योग्य ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. यासाठी खड्डे बुजविण्यासाठी सुमारे ६.५० कोटी रुपयांचा निधी तात्पुरत्या उपाययोजनेसाठी मंजूर असल्याचे सांगण्यात येत आहे.
कायमस्वरूपी काँक्रिटीकरणाचे काम सुरू होईपर्यंत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खड्डे तातडीने बुजवावेत. विशेषतः गणेशोत्सवापूर्वी डागडुजीची कामे पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गाची दुरवस्था केवळ स्थानिक वाहतुकीचा प्रश्न नसून गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रवासी वाहतुकीसाठीही गंभीर ठरू शकते. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करून रस्ता वाहतुकीयोग्य करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.