गणेशभक्तांच्या सुरक्षित प्रवासासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज; मुंबई–गोवा महामार्गावर २४×७ आरोग्य सुविधा
गणेशभक्तांच्या सुरक्षित प्रवासासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज; मुंबई–गोवा महामार्गावर २४×७ आरोग्य सुविधा
रायगड :
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई–गोवा महामार्गावर वाढणारी वाहतूक लक्षात घेता गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी रायगड जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने विशेष आरोग्य आणि सुविधा व्यवस्था सज्ज ठेवली आहे. अपघात किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत गणेशभक्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी विविध ठिकाणी सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत.
महामार्गावर सुविधा केंद्रे
कर्नाळा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड शहर (मोहोप्रा ब्रिज), पनाडेवाडी आणि धामणदेवी–कशेडी घाट या ठिकाणी सुविधा केंद्रे कार्यरत आहेत.
या केंद्रांवर पोलीस मदत केंद्र, आरोग्य व वैद्यकीय कक्ष, वाहन दुरुस्ती कक्ष, बालक आहार कक्ष, महिलांसाठी फिडींग कक्ष तसेच मोफत चहा, बिस्कीट आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पाच वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका सज्ज
गणेशोत्सव काळात आपत्कालीन वैद्यकीय सेवा देण्यासाठी ५ वैद्यकीय पथके आणि सुसज्ज रुग्णवाहिका २४×७ सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा रुग्णालय पनवेल, उपजिल्हा रुग्णालय पेण, जिल्हा रुग्णालय माणगाव, ग्रामीण रुग्णालय महाड आणि ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे आवश्यक वैद्यकीय व्यवस्था करण्यात आली आहे.
पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या विविध यंत्रणा समन्वयाने कार्यरत आहेत. गणेशभक्तांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.