यंदाचा श्रीगणेशोत्सव सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी वातावरणात साजरा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गणेशोत्सवाच्या विविध व्यवस्थांचा आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून यंदा ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा बैठकीत करण्यात आली. या उपक्रमांतर्गत गणेश मंडपांमध्ये गणेशभक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी, चष्मे वाटप तसेच महिलांसाठी स्तनाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी गणेश मंडळांनी मंडपांमध्ये आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या काळात महिलांच्या सुविधेसाठी हिरकणी कक्ष आणि प्रसाधनगृहे २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गणेशमूर्तींच्या आगमन व विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविणे, धोकादायक केबल्स हटविणे आणि आवश्यक वृक्षछाटणीची कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेकडून मूर्तिकारांना ८५८ टन शाडू माती आणि २५ हजार ४०० लिटर पर्यावरणपूरक रंग मोफत वितरित करण्यात आले आहेत.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ६ फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईत एकूण ३७८ विसर्जन स्थळे सज्ज करण्यात येत आहेत. यामध्ये ४४ समुद्रकिनारे, २३ नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि २८१ कृत्रिम तलावांचा समावेश आहे. नागरिकांना विसर्जन स्थळांची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी ही माहिती QR Code आणि Google Maps वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या बैठकीस उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेते अमेय घोले, एआयएमआयएम गटनेते विजय उबाळे, मनसे गटनेते यशवंत किल्लेदार, सपा गटनेत्या अम्रीन अब्रहानी, सुधार समिती अध्यक्ष संध्या दोषी-सक्रे, बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव, अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे, डॉ. विपिन शर्मा, अभिजीत बांगर, डॉ. अविनाश ढाकणे, उपआयुक्त प्रशांत सपकाळे यांच्यासह पोलीस, वाहतूक विभाग आणि गणेशोत्सव समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.