गणेश घाटावर ‘आभार आणि संकल्प’ची रांगोळी; कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता व वृक्षारोपणाचा संदेश

0
12
कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता व वृक्षारोपणाचा संदेश
कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता व वृक्षारोपणाचा संदेश

गणेश घाटावर ‘आभार आणि संकल्प’ची रांगोळी; कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता व वृक्षारोपणाचा संदेश

कुडाळ :
शासकीय सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणे, प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि शहर अधिक स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी बनविण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या देशव्यापी **‘सेवा संकल्प अभियाना’**अंतर्गत कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. दि. १७ रोजी प्रसिद्ध गणेश घाटावर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना विहित मुदतीत शासकीय व नागरी सेवा पारदर्शकपणे मिळाव्यात, तसेच नागरिकांच्या सहभागातून परिसर स्वच्छता, आरोग्य जनजागृती आणि पर्यावरण संवर्धनाला चालना मिळावी, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. गणेश घाटावर नागरिक, नगरपंचायत कर्मचारी व विविध घटकांनी एकत्र येत भव्य मानवी साखळी तयार केली.
राष्ट्रीय एकात्मता आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी घाट परिसरात भारताच्या नकाशाची भव्य व कलात्मक रांगोळी रेखाटण्यात आली होती. या उपक्रमातून शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याचा संदेश देण्यात आला. तसेच गणेश घाट व परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नगरपंचायतीचे कर्मचारी आणि नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेत परिसर कचरामुक्त केला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते घाट परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिक व कर्मचाऱ्यांना परिसर, गल्ली आणि शहर कायम स्वच्छ ठेवण्याची ‘स्वच्छतेची शपथ’ देण्यात आली.
कार्यक्रमाला नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, नगरसेविका नयना मांजरेकर, मुख्याधिकारी खंडू पवळ, नगरपंचायतीचे अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता दूत तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here