गॅस तुटवड्याचा फटका : फोर्टमधील नामांकित ‘द्वारका’ हॉटेल तात्पुरते बंद
मुंबई, प्रतिनिधी :
मुंबईतील फोर्ट परिसरातील चाकरमान्यांसाठी अनेक वर्षांपासून नाश्ता आणि जेवणाचे विश्वासार्ह ठिकाण म्हणून ओळखले जाणारे नामांकित ‘द्वारका’ व्हेज रेस्टॉरंट सध्या गॅस तुटवड्यामुळे तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे. हिरणीमान सर्कल, फोर्ट, मुंबई येथे असलेल्या या हॉटेलच्या बंदमुळे नियमित ग्राहकांमध्ये नाराजी आणि हळहळ व्यक्त होत आहे.
सध्याच्या युद्धजन्य पार्श्वभूमीमुळे निर्माण झालेल्या गॅस पुरवठा तुटवड्याचा परिणाम थेट हॉटेल व्यवसायावर होत असून, त्याचा फटका ‘द्वारका’सारख्या जुन्या आणि लोकप्रिय उपाहारगृहांनाही बसला आहे. अनेक वर्षांपासून फोर्ट परिसरात नोकरी-व्यवसायासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे हॉटेल म्हणजे परवडणाऱ्या, चविष्ट आणि शाकाहारी भोजनाचा आधारस्तंभ मानले जात होते.
सकाळच्या नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत येथे नेहमीच ग्राहकांची वर्दळ असायची. त्यामुळे हॉटेल अचानक बंद राहिल्याने परिसरातील कार्यालयीन कर्मचारी, व्यापारी तसेच नियमित ग्राहकांची गैरसोय होत आहे.
गॅस पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर हॉटेल पुन्हा सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, या घटनेमुळे आवश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा किती गंभीर परिणाम होऊ शकतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.


