गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्क व संवर्धनाबाबत १५ दिवसांत अहवाल सादर करा- मंत्री ॲड. आशिष शेलार
गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्क व संवर्धनाबाबत १५ दिवसांत अहवाल सादर करा- मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई — रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्क, कायदेशीर स्थिती आणि संवर्धनाशी संबंधित विविध मुद्द्यांचा सखोल अभ्यास करून पुढील १५ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
मंत्रालयात आयोजित बैठकीत गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्कासंदर्भातील वाद, न्यायालयीन प्रक्रिया, पुरातत्त्वीय महत्त्व तसेच संभाव्य संपादनाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
गोपाळगड हा मराठा कालखंडातील ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ला असून त्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता त्याच्या खासगी मालकीच्या दाव्यांचा तसेच मूळ इतिहासाचा सखोल शोध घेण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री शेलार यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपलब्ध अभिलेख, पूर्वी झालेली लिलाव प्रक्रिया, इव्हॅक्युई प्रॉपर्टी (Evacuee Property) म्हणून असलेला संभाव्य दर्जा आणि संबंधित सर्व कायदेशीर व महसुली कागदपत्रांची बारकाईने तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले. किल्ल्याच्या मालकी हक्काबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महसूल विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, उपसचिव महेश वाव्हळ, पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे रत्नागिरी जिल्हाधिकारी, चिपळूणचे उपविभागीय अधिकारी, गुहागरचे तहसीलदार आणि संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.
गोपाळगड किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या पुढील उपाययोजनांबाबत अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.