घणसोलीत विविध उपक्रमांनी राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
घणसोलीत विविध उपक्रमांनी राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांनी सादर केली क्रीडा प्रात्यक्षिके; मल्लखांबासह विविध खेळांना उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी मुंबई :
जागतिक कीर्तीचे हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा राष्ट्रीय क्रीडा दिन नवी मुंबईतील घणसोली शाळेत विविध क्रीडा व जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांची प्रात्यक्षिके, मैदानी खेळ, शारीरिक तंदुरुस्तीचे उपक्रम तसेच मल्लखांबाची आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली.
विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, नियमित व्यायाम आणि खेळाचे महत्त्व समजावे तसेच निरोगी जीवनशैलीचा संदेश त्यांच्या मनात रुजावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी नगरसेवक तथा क्रीडा समिती सदस्य निशांत भगत, ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटके, नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपआयुक्त अभिलाषा पाटील, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, राज्य क्रीडा मार्गदर्शक मनीषा मानकर, मल्लखांब खेळातील अर्जुन पुरस्कारप्राप्त हेमाली परब, जिम्नॅस्टिकमधील शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त श्रद्धा तळेकर, खो-खो खेळातील शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त कविता घाणेकर, मुख्याध्यापिका अर्चना म्हात्रे तसेच क्रीडा शिक्षक संतोष मुंढे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी निशांत भगत यांनी नवी मुंबईतील खेळाडूंच्या विकासासाठी महापालिकेच्या माध्यमातून अधिकाधिक दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. खेळाडूंसाठी आवश्यक क्रीडांगणे, प्रशिक्षण सुविधा, क्रीडा साहित्य तसेच इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक कार्यवाही करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
नवी मुंबईतील खेळाडूंना योग्य सुविधा आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी चांगली कामगिरी करू शकतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
मेजर ध्यानचंद यांच्या प्रेरणादायी स्मृतींना अभिवादन करत विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने राष्ट्रीय क्रीडा दिनाचा हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.