चंद्रनगर शाळेचा बीडीओंकडून सन्मान
दापोली l प्रतिनिधी :
दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर या शाळेतील आरोही महेश मुलुख व नीरजा मनोज वेदक या दोन विद्यार्थिनींची ‘नासा- इस्रोस विद्यार्थी भेट’ उपक्रमांतर्गत अमेरिकेतील नासा व भारतातील इस्रो अशा दोन्ही अवकाश संशोधन संस्थांच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याने दापोलीचे गट विकास अधिकारी गणेश मंडलीक यांनी चंद्रनगर येथे दोन्ही विद्यार्थीनींचा सन्मान करुन त्यांना या अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या नासा- इस्रो भेट उपक्रमांतर्गत चाळणी परीक्षेत चंद्रनगर शाळेतील आरोही महेश मुलुख व नीरजा मनोज वेदक या दोन्ही मुलींनी रत्नागिरी जिल्हास्तरीय चाळणी परीक्षेत अव्वल यश संपादन केल्याने या दोघींची अमेरिके -तील नासा व भारतातील इस्रो या अवकाशसंशोधन केंद्र भेटीसाठी निवड झाली आहे. लवकरच या अभ्यास दौऱ्यास सुरुवात होणार आहे. या दोन्ही दौऱ्यांसाठीचा संपूर्ण खर्च रत्नागिरी जिल्हा परिषद करणार आहे. चंद्रनगर शाळेने मिळविलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल दापोलीचे गट विकास अधिकारी गणेश मंडलीक यांनी चंद्रनगर येथे या दोन्ही मुलींचा सन्मान केला व त्यांना दोन्ही अभ्यास दौऱ्यांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी पंचायत समिती वित्त अधिकारी राजेंद्र मोहिते, चंद्रनगर ग्रामपंचायत अधिकारी संदीप सकपाळ, चंद्रनगर शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक, शिक्षक मानसी सावंत, बाबू घाडीगांवकर, रेखा ढमके आदी उपस्थित होते.


