चिपळूणमध्ये शौर्य दिन व सेवा संकल्प अभियान; शूरवीरांच्या त्यागाला मानवंदना

0
21
चिपळूणमध्ये शौर्य दिन व सेवा संकल्प अभियान; शूरवीरांच्या त्यागाला मानवंदना
चिपळूणमध्ये शौर्य दिन व सेवा संकल्प अभियान; शूरवीरांच्या त्यागाला मानवंदना

चिपळूणमध्ये शौर्य दिन व सेवा संकल्प अभियान; शूरवीरांच्या त्यागाला मानवंदना

चिपळूण :
रत्नागिरी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘शौर्य दिन’ आणि ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडले. यावेळी देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर जवानांना कृतज्ञतापूर्वक मानवंदना देण्यात आली. तसेच वीर माता-पिता, वीर नारी, माजी सैनिक आणि वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला.

युनायटेड इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एअर मार्शल एच. एन. भागवत (निवृत्त, PVSM, AVSM, VM) उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर राष्ट्रगीत व अमर जवान स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
‘सॅल्यूट टू रिअल हिरो’ या उपक्रमांतर्गत जिजाऊ महिला ब्रिगेडच्या सदस्या आणि युनायटेड इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी माजी सैनिकांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले. नव्या पिढीकडून मिळालेल्या या आदरामुळे अनेक माजी सैनिक भावूक झाले. यावेळी वीर माता-पिता, वीर नारी आणि वीरपत्नींचाही सन्मान करण्यात आला.
२२ माजी सैनिकांना सेवा व मदत
‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत एकूण २२ माजी सैनिकांना विविध सेवा व मदतीचा लाभ मिळवून देण्यात आला. दोन माजी सैनिकांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले. तसेच २० माजी सैनिक व वीरपत्नींची पेन्शन आणि विविध कल्याणकारी योजनांशी संबंधित प्रकरणे स्वीकारून त्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन व सहकार्य करण्यात आले.
विद्यार्थ्यांना सैन्यभरती, सायबर सुरक्षा व वाहतूक नियमांचे मार्गदर्शन
कल्याण संघटक राहुल काटे यांनी विद्यार्थ्यांना सैन्यभरतीपूर्व तयारी, शिस्त, शारीरिक क्षमता तसेच संरक्षण दलातील विविध करिअर संधींची माहिती देत देशसेवेची प्रेरणा दिली. पोलीस निरीक्षक ओम आघाव यांनी बदलत्या काळातील सायबर गुन्हे, डिजिटल सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन केले.
‘वंदे मातरम्’ने कार्यक्रमाचा समारोप झाला. वसतिगृह अधीक्षक योगेश बने यांनी आभार मानले. माजी सैनिकांच्या त्यागाचा सन्मान करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा आणि राष्ट्रभक्तीची भावना रुजवणारा हा उपक्रम चिपळूणमध्ये संस्मरणीय ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here