चिमुकल्या हातांनी जवानांना ३२० राख्यांची प्रेमाची भेट; साखळोली क्र. १ शाळेचा ‘एक राखी जवानांसाठी’ उपक्रम उत्साहात

0
4
चिमुकल्या हातांनी जवानांना ३२० राख्यांची प्रेमाची भेट; साखळोली क्र. १ शाळेचा ‘एक राखी जवानांसाठी’ उपक्रम उत्साहात
चिमुकल्या हातांनी जवानांना ३२० राख्यांची प्रेमाची भेट; साखळोली क्र. १ शाळेचा ‘एक राखी जवानांसाठी’ उपक्रम उत्साहात

चिमुकल्या हातांनी जवानांना ३२० राख्यांची प्रेमाची भेट; साखळोली क्र. १ शाळेचा ‘एक राखी जवानांसाठी’ उपक्रम उत्साहात

दापोली प्रतिनिधी : अरविंद मांडवकर
दापोली : देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता, प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी दापोली तालुक्यातील जि. प. शाळा साखळोली क्र. १ येथील विद्यार्थ्यांनी ‘एक राखी जवानांसाठी’ या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या तब्बल ३२० राख्या जवानांसाठी पाठविल्या असून, त्यासोबत जवानांना आपुलकीने लिहिलेली पत्रेही पाठविण्यात आली आहेत.

दापोली तालुक्यातील ग्रामीण शाळांमध्ये गेल्या दोन दशकांहून अधिक काळ ‘एक राखी जवानांसाठी’ हा राष्ट्रप्रेमाचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. गावतळे ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक तथा आझाद हिंद ट्रस्ट, कोल्हापूरचे प्रवर्तक प्रा. संदिप वारके यांच्या पुढाकारातून हा उपक्रम सुरू आहे.

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, श्रमप्रतिष्ठा, संवेदनशीलता आणि देशसेवेची भावना रुजावी, या उद्देशाने कार्यानुभव विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून राख्या तयार करून त्या सीमेवरील जवानांपर्यंत पोहोचविल्या जातात.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून साखळोली क्र. १ शाळेतील विद्यार्थ्यांनी लोकरीपासून स्वतः तयार केलेल्या ३२० राख्या शाळेचे शिक्षक समीर ठसाळ आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रा. संदिप वारके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. गावतळे पंचक्रोशीसह दापोली तालुक्यातील विविध शाळांमधून संकलित होणाऱ्या राख्या आझाद हिंद ट्रस्टच्या माध्यमातून सीमेवरील जवानांपर्यंत पोहोचविण्यात येतात.
या उपक्रमाचे आणखी एक भावनिक वैशिष्ट्य म्हणजे राख्यांसोबत विद्यार्थ्यांनी जवानांसाठी लिहिलेली पत्रे. ‘प्रिय सैनिक दादा…’ अशा प्रेमळ शब्दांनी सुरू होणाऱ्या या पत्रांमधून चिमुकल्यांनी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांप्रती कृतज्ञता, प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे.
शिक्षक संगिता लोहारे आणि समीर ठसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राबविलेला हा उपक्रम केवळ राखी पाठविण्यापुरता मर्यादित न राहता, चिमुकल्या मनांमध्ये राष्ट्रप्रेमाची बीजे रुजविणारा ठरला आहे. जवानांच्या त्यागाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी आणि देशसेवेची भावना त्यांच्या मनात दृढ व्हावी, या दृष्टीने साखळोली क्र. १ शाळेचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here