चुकीच्या एचआयव्ही निदानाचा आरोप करत मृत गणपत राणे यांच्या कुटुंबीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

0
58
चुकीच्या एचआयव्ही निदानाचा आरोप करत मृत गणपत राणे यांच्या कुटुंबीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
चुकीच्या एचआयव्ही निदानाचा आरोप करत मृत गणपत राणे यांच्या कुटुंबीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

चुकीच्या एचआयव्ही निदानाचा आरोप करत मृत गणपत राणे यांच्या कुटुंबीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

ओरोस, प्रतिनिधी : एचआयव्ही बाधित असल्याचे चुकीचे निदान झाल्यानंतर उपचार प्रक्रियेत गंभीर हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत मृत कै. गणपत सहदेव राणे यांच्या पत्नी आणि मुलाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या चुकीच्या निदानामुळे केवळ गणपत राणे यांचा निष्पाप बळी गेला नाही, तर कुटुंबाची समाजात बदनामीही झाली, असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. संबंधित सर्वांवर कठोर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, चुकीच्या उपचारांमुळे आणि खोडसाळ निदानामुळे गणपत राणे यांचा १३ नोव्हेंबर २०२५ रोजी मृत्यू झाला. ओसरगाव येथे एका स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरात त्यांना एचआयव्ही बाधित असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर त्याच अनुषंगाने उपचार सुरू करण्यात आले. मात्र, मृत्यूनंतरच्या वैद्यकीय नोंदींमध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण मूत्राशयाचा आजार, मेंदूतील रक्तस्त्राव आणि मेंदूत रक्ताच्या गाठी असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सुरुवातीला करण्यात आलेले एचआयव्हीचे निदान आणि नंतरच्या वैद्यकीय अहवालांमध्ये मोठी विसंगती असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

एचआयव्हीसारख्या संवेदनशील आणि संसर्गजन्य आजाराबाबत रुग्णाच्या जवळच्या नातेवाईकांना माहिती देणे अत्यावश्यक असताना संबंधितांनी पत्नी किंवा मुलाला याची कोणतीही कल्पना दिली नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे तर, कुटुंबीयांना कोणतीही अधिकृत कागदपत्रे न देता उपचार सुरू करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

कुटुंबीयांनी सांगितले की, २०२२ मध्ये म्हापण येथे झालेल्या आरोग्य शिबिरात हा आजार आढळल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यासंबंधीचे कोणतेही वैद्यकीय पुरावे, तपासणी अहवाल किंवा अधिकृत कागदपत्रे त्यांना देण्यात आली नाहीत. दुसरीकडे, मृत्यूसमयी उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या अहवालात एचआयव्हीचा उल्लेखच नसल्याने सुरुवातीला केलेल्या निदानावरच संशय निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीनुसार, ओसरगाव येथील जागृती फाऊंडेशन, निदान करणारे वैद्यकीय अधिकारी, उपचार प्रक्रियेची चौकशी करणारे स्वयंसेवक, ओरोस येथील जिल्हा रुग्णालय तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय यांची भूमिका तपासण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

या सर्व मागण्यांसाठी गणपत राणे यांच्या पत्नी आणि मुलाने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता प्रशासन या उपोषणाची आणि कुटुंबीयांच्या आरोपांची कितपत दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here