जबलपूर–कोईम्बतूर साप्ताहिक एक्स्प्रेसचे नियमितीकरण; कोकणातील प्रवाशांना मोठा फायदा
जबलपूर–कोईम्बतूर साप्ताहिक एक्स्प्रेसचे नियमितीकरण; कोकणातील प्रवाशांना मोठा फायदा
जबलपूर : जबलपूर जंक्शन–कोईम्बतूर जंक्शन–जबलपूर जंक्शन दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडी क्रमांक 02198/02197 चे नियमितीकरण करण्यात आले असून, आता ही सेवा 20160/20159 जबलपूर–कोईम्बतूर–जबलपूर साप्ताहिक एक्स्प्रेस म्हणून धावणार आहे.
गाडी क्रमांक 20160 जबलपूर जंक्शनवरून 23 ऑक्टोबर 2026 पासून दर शुक्रवारी रात्री 11.50 वाजता सुटेल. तर गाडी क्रमांक 20159 कोईम्बतूर जंक्शनवरून 26 ऑक्टोबर 2026 पासून दर सोमवारी सायंकाळी 5.05 वाजता सुटणार आहे.
या गाडीला नरसिंगपूर, गाडरवारा, पिपरिया, इटारसी जंक्शन, हरदा, खांडवा, भुसावळ जंक्शन, नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, मुकांबी, कुंडवा, मंगळुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, वडकारा, कोझिकोडे, तिरूर, शोरानूर जंक्शन आणि पलक्कड जंक्शन या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
या गाडीमुळे कोकणातील कणकवली, कुडाळ, रत्नागिरी, चिपळूण, खेड, रोहा तसेच पनवेल परिसरातील प्रवाशांना जबलपूर, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतातील कोईम्बतूरसह विविध शहरांशी रेल्वेने प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
कोकणातील तसेच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गाडीचे नवीन क्रमांक, वेळापत्रक आणि नियमित सेवेची तारीख यांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे.