काटवलीच्या सुजितची स्पेनवारी; आय.टी.आय.च्या कौशल्याने उघडले आंतरराष्ट्रीय दरवाजे
जिद्दीच्या जोरावर ग्रामीण भागातून थेट स्पेन; आय.टी.आय. संगमेश्वरच्या सुजित जाधवला पॅसेंजर शिपवर लाखभर पगाराची नोकरी
लांजा/प्रतिनिधी राहूल वर्दे
रत्नागिरी, 30 जून: संगमेश्वर तालुक्यातील काटवली हे छोटंसं गाव. याच गावातला सुपुत्र सुजित जाधव याने जिद्द, मेहनत आणि कौशल्याच्या बळावर थेट स्पेनपर्यंत गरुडझेप घेतली आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आय.टी.आय. संगमेश्वरचा माजी विद्यार्थी असलेल्या सुजितची स्पेनमधील एका नामवंत आंतरराष्ट्रीय पॅसेंजर शिप कंपनीत ‘असिस्टंट प्लंबर’ पदावर निवड झाली आहे. या पदासाठी त्याला प्रतिमहा एक लाख रुपयांपेक्षा जास्त वेतन मिळणार आहे. एका छोट्याशा गावातून थेट आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपनीपर्यंतचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
कौशल्य हेच खरं भांडवल
सुजितच्या या यशाने आय.टी.आय. संस्थेसह संपूर्ण संगमेश्वर तालुक्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे. स्वतःच्या यशाबद्दल बोलताना सुजित सांगतो की आजच्या आधुनिक युगात तरुणांनी केवळ पदव्यांमागे न धावता प्रत्यक्ष कौशल्यांवर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. भविष्यात फिटिंग, वेल्डिंग, प्लंबिंग, सुतारकाम, इलेक्ट्रिकल आणि यांत्रिक काम यांसारख्या तांत्रिक व व्यावहारिक कौशल्यांना जगभरात प्रचंड मागणी असणार आहे.
एआय घेऊ शकत नाही मानवी कौशल्याची जागा
सुजित आवर्जून सांगतो की आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही प्रगत झाली तरी ती मानवी हातांच्या तांत्रिक कौशल्याची जागा घेऊ शकत नाही. जहाजावर पाईप लाईन जोडणे, लिकेज काढणे, नवीन फिटिंग करणे ही कामे प्रत्यक्ष हातानेच करावी लागतात. तिथे रोबोट किंवा एआय चालत नाही. म्हणूनच प्लंबिंगसारख्या स्किलला जगात कधीच मागणी कमी होणार नाही.
आय.टी.आय.मुळे बदलले आयुष्य
सुजितने बारावीनंतर थेट आय.टी.आय. संगमेश्वरमध्ये प्लंबर ट्रेडला प्रवेश घेतला. तिथे त्याने मन लावून प्रॅक्टिकल शिकला. संस्थेतल्या शिक्षकांनी दिलेलं मार्गदर्शन आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर त्याने कौशल्य पक्कं केलं. कोर्स पूर्ण झाल्यावर देशात काही ठिकाणी काम केले आणि अनुभव घेतला. त्याच अनुभवाच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय कंपनीत अर्ज केला. मुलाखतीच्या प्रत्येक फेरीत त्याचं कौशल्य आणि आत्मविश्वास उठून दिसला. अखेर स्पेनच्या कंपनीने त्याची निवड केली.
ग्रामीण तरुणांना नवा संदेश
सुजित आजच्या तरुण पिढीला आवाहन करतो की प्रगत युगात टिकून राहण्यासाठी आणि स्वतःची प्रगती साधण्यासाठी व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या आय.टी.आय. सारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे. तिथून योग्य कौशल्य आत्मसात करून आपण जागतिक स्तरावर प्राविण्य मिळवू शकतो. पदवी असली तरी हाताला काम नसेल तर उपयोग नाही. पण हातात कौशल्य असेल तर जगात कुठेही संधी मिळते, हे सुजितने दाखवून दिले आहे.
सुजित जाधवच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याधारित शिक्षणाविषयी एक नवा उत्साह निर्माण झाला आहे. काटवलीसारख्या गावातून निघालेला एक तरुण आज स्पेनच्या समुद्रात जहाजावर काम करणार आहे. ही केवळ त्याच्या घराची नाही तर संपूर्ण कोकणाची आणि महाराष्ट्राच्या आय.टी.आय. शिक्षणपद्धतीची शान आहे. डिग्रीपेक्षा स्किल मोठं, हे सुजितने कृतीतून सिद्ध केलं आहे.