जि. प.–पं. स. निवडणुकीत जनतेचा कौल बंदिस्त
सिंधुदुर्गात लोकशाहीचा उत्सव ६०.११% मतदान!
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकशाहीचा उत्सव पाहायला मिळाला. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर उसळलेल्या रांगांमधून मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग स्पष्टपणे दिसून आला. तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करत प्रशासनाझाले असून, ही टक्केवारी ग्रामीण स्वराज्य संस्थांबाबत जनतेच्या वाढत्या जागृतीचे द्योतक मानली जात आहे.
तालुकानिहाय आकडेवारी पाहता वेंगुर्ले तालुक्याने ६९.०३ टक्के मतदानासह जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले, तर सावंतवाडी तालुक्यात ६७.४५ टक्के इतके दणदणीत मतदान झाले. राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कणकवली (५९.८४%) आणि दोडामार्ग (५९.८३%) तालुक्यांत जवळपास समान टक्केवारीत मतदान नोंदले गेले. मालवण (५८.९०%), देवगड (५७%), वैभववाडी (५४.७९%) आणि कुडाळ (५४%) या तालुक्यांतही समाधानकारक मतदान झाले आहे.
देवगड तालुक्यात तिर्लोट, मिठमुंबरी, आणि दाभोळे येथील केंद्रांवर मतदानयंत्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रक्रिया काही काळ खोळंबली होती, मात्र निवडणूक विभागाने तात्काळ यंत्रे बदलल्याने मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले. जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी स्वतः देवगड तालुक्यातील विविध मतदान केंद्रांवर भेटी देऊन प्रक्रियेचा आढावा घेतला.
संपूर्ण जिल्ह्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. किरकोळ तांत्रिक अडचणी वगळता निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. आता सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या मतदानातून नेमका कुणाचा विजय होणार, हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.
मतदारांनी दिलेला कौल विकास, नेतृत्व आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भविष्यासाठी कोणत्या दिशेने जातो, हे लवकरच स्पष्ट होईल. तोपर्यंत सर्व उमेदवार व समर्थकांमध्ये उत्सुकता आणि अपेक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे.


