जुनी प्रकरणे वेळेत निकाली काढा, अन्यथा कारवाई; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा अधिकाऱ्यांना इशारा
जुनी प्रकरणे वेळेत निकाली काढा, अन्यथा कारवाई; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा अधिकाऱ्यांना इशारा
रत्नागिरी : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी व समस्या स्थानिक पातळीवरच मार्गी लागल्या पाहिजेत. विविध विभागांनी परस्पर समन्वय साधून अर्ज व तक्रारी वेळेत निकाली काढाव्यात. जुनी प्रकरणे अद्यापही प्रलंबित राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा जिल्हाधिकारी मनुज जिंदल (Manuj Jindal) यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, भूमिअभिलेख अधीक्षक सचिन इंगळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक निलेश माईनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लोकशाही दिनात नागरिकांच्या विविध तक्रारी व अर्जांवर सुनावणी करण्यात आली. कारवांचीवाडी आदर्श वसाहतीत उभारण्यात येत असलेल्या अपार्टमेंट प्रकल्पासंदर्भातील स्थळपाहणी अहवालावर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जिंदल यांनी दिले. विकासक नियमांचे पालन करत नसल्यास त्याबाबत योग्य आदेश काढण्यासही त्यांनी सांगितले.
यावेळी पाणंद शिवार रस्ते, सिमांकन, वहीवाटीच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे आदी विषयांवर तहसीलदार, प्रांताधिकारी आणि भूमिअभिलेख विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नव्याने प्राप्त झालेल्या अर्जांवर १५ दिवसांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
मागील प्रलंबित अर्जांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी जिंदल यांनी नाराजी व्यक्त केली. एप्रिल महिन्यापासूनचे काही अर्ज अद्याप प्रलंबित असल्याची बाब गंभीर असल्याचे सांगत, विहित मुदतीत तक्रारी व अर्ज निकाली न काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.