‘ज्ञान भारतम’ मोहिमेत सहभागी व्हा; दुर्मिळ हस्तलिखितांच्या नोंदणीसाठी रायगड विभागाचे आवाहन
‘ज्ञान भारतम’ मोहिमेत सहभागी व्हा; दुर्मिळ हस्तलिखितांच्या नोंदणीसाठी रायगड विभागाचे आवाहन
रायगड:
ज्ञान भारतम या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय रायगड विभाग यांनी केले आहे.
या मोहिमेअंतर्गत देशभरातील दुर्मिळ हस्तलिखिते, प्राचीन पोथ्या, ताम्रपट तसेच पुरातत्व अभिलेखांचा शोध घेऊन त्यांची अधिकृत नोंदणी आणि दस्तऐवजीकरण करण्यात येत आहे. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
महाराष्ट्राला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची मोठी परंपरा लाभली असली तरी इतर राज्यांच्या तुलनेत हस्तलिखितांची नोंदणी कमी प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यातील अनेक धार्मिक, सामाजिक आणि कौटुंबिक सार्वजनिक न्यासांकडे मौल्यवान ग्रंथ, पोथ्या आणि ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध असून त्यांचे संवर्धन आणि जतन करणे काळाची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक न्यासांचे अध्यक्ष, सचिव, विश्वस्त आणि व्यवस्थापक यांना त्यांच्या ताब्यात असलेली प्राचीन हस्तलिखिते, ताम्रपट किंवा पुरातत्व अभिलेख यांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रक्रियेमध्ये संबंधित दस्तऐवजांची मालकी न्यासाकडेच राहणार असून केवळ राष्ट्रीय स्तरावर त्यांचे दस्तऐवजीकरण केले जाणार आहे.
हस्तलिखिते आणि पुरातत्व अभिलेखांच्या नोंदणीसाठी संबंधितांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, रायगड विभाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क :
📍 सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, रायगड विभाग, रायगड 📞 हेल्पलाईन : ०२१४१-२२२४६२ ✉️ ईमेल : [email protected]