भाईंदर (पूर्व) येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा संस्था आपल्या सभासदांचे वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरे करून सामाजिक बांधिलकी जपत असते. शारीरिक कारणांमुळे किंवा अन्य अडचणींमुळे समारंभस्थळी उपस्थित राहू न शकणाऱ्या ज्येष्ठ सभासदांच्या घरी जाऊन त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्याचा अनुकरणीय उपक्रम संस्था सातत्याने राबवत आहे.
याच उपक्रमांतर्गत संस्थेचे ज्येष्ठ सभासद रामप्रकाश झिलू राणे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष शंकर जंगम यांच्या नेतृत्वाखाली रघुवीर नाईक, अनंत आंगचेकर तसेच इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. त्यांनी राणे यांचा शाल, भेटवस्तू व शुभेच्छा देऊन सत्कार केला. घरच्या घरी झालेल्या या सन्मानामुळे सत्कारमूर्तींच्या चेहऱ्यावरील समाधान अलौकिक असते. उमटलेले समाधान उपस्थितांच्या मनाला भावले. ज्येष्ठ नागरिकांना आत्मीयता, सन्मान आणि आपलेपणाची जाणीव करून देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी व अनुकरणीय असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.