ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांचा ‘वन्स मोअर प्रोडक्शन्स’तर्फे गौरव

0
22
ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांचा ‘वन्स मोअर प्रोडक्शन्स’तर्फे गौरव
ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांचा ‘वन्स मोअर प्रोडक्शन्स’तर्फे गौरव

ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांचा ‘वन्स मोअर प्रोडक्शन्स’तर्फे गौरव

पुणे, दि. ७ सप्टेंबर :
मराठी रंगभूमीच्या नेपथ्यविश्वात आपल्या कल्पकतेने, निष्ठेने आणि प्रदीर्घ रंगसाधनेने स्वतंत्र ठसा उमटविणारे ज्येष्ठ नेपथ्यकार सुरेश ऊर्फ बाबा पार्सेकर यांचा आज ‘वन्स मोअर प्रोडक्शन्स, मुंबई’ यांच्या वतीने त्यांच्या निगडी गावठाण, पुणे येथील निवासस्थानी आत्मीय वातावरणात गौरव करण्यात आला.
बाबा पार्सेकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मूळतः मोठ्या स्वरूपात आयोजित करण्यात येणारा हा गौरव सोहळा छोटेखानी स्वरूपात त्यांच्या निवासस्थानी घेण्यात आला. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह, मानपत्र, रोख रक्कम, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांच्या प्रदीर्घ रंगसेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
मराठी रंगभूमीवरील नेपथ्यकलेला स्वतंत्र कलात्मक उंची प्राप्त करून देण्यात बाबा पार्सेकर यांचे योगदान मोलाचे आहे. नाटकाची संहिता, दिग्दर्शकाची संकल्पना आणि रंगमंचाच्या मर्यादा यांचा नेमका मेळ साधत त्यांनी अनेक दशकांपासून असंख्य नाट्यप्रयोगांना आपल्या नेपथ्यातून स्वतंत्र ओळख दिली. बाराशेहून अधिक अधिकृत नोंद असलेल्या नाटकांसाठी त्यांनी नेपथ्यकार म्हणून काम केले असून, त्याशिवाय नोंद नसलेल्या शेकडो नाटकांच्या आणि हजारो नाट्यप्रयोगांच्या रंगप्रवासातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.
यावेळी कामाक्षी क्रिएटिव्ह, मुंबईचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचे मुंबई समन्वयक राकेश तळगावकर यांनी बाबा पार्सेकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “बाबांच्या कार्याचा आवाका पाहता त्यांचा गौरव भव्य स्वरूपात व्हायला हवा होता. मात्र त्यांच्या प्रकृतीचा विचार करून हा कार्यक्रम त्यांच्या निवासस्थानी छोटेखानी स्वरूपात आयोजित करण्यात आला. हा केवळ सत्कार नसून नाट्यकर्मींकडून त्यांच्या प्रदीर्घ कार्याप्रती व्यक्त करण्यात आलेली कृतज्ञता आहे. बाराशेहून अधिक नाटकांचा आणि हजारो प्रयोगांचा त्यांचा प्रवास मराठी रंगभूमीसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.”
वन्स मोअर प्रोडक्शन्सच्या संचालिका प्रणोती कनगुटकर यांनी बाबा पार्सेकर यांच्या प्रदीर्घ रंगप्रवासाचा आढावा घेत त्यांच्या नेपथ्यकलेतील योगदानाला उजाळा दिला. बदलत्या काळानुसार रंगभूमीतील तंत्र आणि नेपथ्याच्या संकल्पनांमध्ये झालेले बदल स्वीकारतानाही स्वतःची स्वतंत्र कलादृष्टी कायम राखण्याची बाबा पार्सेकर यांची क्षमता नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे प्रमुख कार्यवाह सुहास जोशी यांनी बाबा पार्सेकर यांच्या योगदानाचा गौरव करताना, रंगमंचामागे राहून कार्य करणाऱ्या नेपथ्यकाराचे नाट्यप्रयोगाच्या दृश्य परिणामातील स्थान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. बाबा पार्सेकर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत नेपथ्यकलेचे महत्त्व सातत्याने अधोरेखित केल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी समाजसेवक अनुज केसरकर, वन्स मोअर प्रोडक्शन्सच्या संचालिका प्रणोती कनगुटकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे प्रमुख कार्यवाह सुहास जोशी, कामाक्षी क्रिएटिव्हचे संचालक राकेश तळगावकर तसेच वन्स मोअर प्रोडक्शन्सचे सदस्य पार्थ सोनावले यांच्यासह रंगभूमी, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी बाबा पार्सेकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कामातील शिस्त, रंगभूमीवरील निष्ठा, प्रयोगशीलता आणि नव्या पिढीतील रंगकर्मींना मार्गदर्शन करण्याच्या वृत्तीचा विशेष उल्लेख केला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी बाबा पार्सेकर यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. मराठी रंगभूमीसाठी आयुष्यभर पडद्यामागे राहून अविरत कार्य करणाऱ्या एका ज्येष्ठ रंगकर्मीप्रती व्यक्त झालेली कृतज्ञता हे या आत्मीय गौरव सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here