ज्येष्ठ पत्रकार तथा ‘तरुण भारत’चे माजी मुख्य संपादक लक्ष्मणराव जोशी यांचे निधन

0
9
ज्येष्ठ पत्रकार तथा 'तरुण भारत'चे माजी मुख्य संपादक लक्ष्मणराव जोशी यांचे निधन
ज्येष्ठ पत्रकार तथा 'तरुण भारत'चे माजी मुख्य संपादक लक्ष्मणराव जोशी यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार तथा ‘तरुण भारत’चे माजी मुख्य संपादक लक्ष्मणराव जोशी यांचे निधन

नागपूर | प्रतिनिधी
मराठी पत्रकारितेतील अभ्यासू, निर्भीड आणि सचोटीचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे ‘तरुण भारत’ दैनिकाचे माजी मुख्य संपादक लक्ष्मणराव त्र्यंबक जोशी (वय ८९) यांचे मंगळवारी दुपारी नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली असून एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक दशकांची प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कारकीर्द घडविलेल्या जोशी यांनी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. आपल्या विद्वत्तापूर्ण दृष्टिकोन, प्रामाणिक पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकीमुळे त्यांनी वाचकांसह पत्रकारितेच्या क्षेत्रात विशेष स्थान निर्माण केले होते.

लक्ष्मणराव जोशी यांनी आपल्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात ‘तरुण भारत’ या मराठी दैनिकातून केली. गोव्यात काही काळ कार्य केल्यानंतर ते नागपूरला परतले आणि पुन्हा ‘तरुण भारत’मध्ये रुजू झाले. आपल्या लेखनशैली, संपादकीय नेतृत्व आणि सामाजिक भान यामुळे त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली.
यानंतर त्यांनी ‘लोकशाही वार्ता’चे संपादक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. निर्भीड लेखन, व्यावसायिक सचोटी आणि सामाजिक प्रश्नांबाबतची संवेदनशीलता यामुळे त्यांना सर्व स्तरांतून आदर प्राप्त झाला. समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांना त्यांनी आपल्या लेखणीतून सातत्याने वाचा फोडली.
पत्रकारितेतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोशी यांनी अनेक सामाजिक विषयांवर प्रकाश टाकत जनजागृती केली. त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत असंख्य युवा पत्रकारांना मार्गदर्शन करून पत्रकारितेचे मूल्य जपण्याची प्रेरणा दिली.
त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेने एक अभ्यासू संपादक, निष्ठावान पत्रकार आणि संवेदनशील विचारवंत गमावला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here