ठाणे जिल्हा परिषद शाळांच्या माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार, शाळेचा सर्वांगीण विकासासाठी हातभार
ठाणे जिल्हा परिषद शाळांच्या माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार, शाळेचा सर्वांगीण विकासासाठी हातभार
ठाणे / प्रतिनिधी :
आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या शाळेने आपल्या आयुष्याचा पाया घातला, त्या शाळेच्या विकासासाठी योगदान देण्याच्या भावनेतून ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या माजी विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण तालुक्यांतील माजी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेतला. स्मार्ट टीव्ही, संगणक, शैक्षणिक साहित्य आणि मूलभूत सुविधांसाठी योगदान दिले. शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्वरूपात मदतीचा हात पुढे केला आहे.
दिवाळीच्या निमित्ताने ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी जिल्हा परिषद शाळांच्या माजी विद्यार्थ्यांना आपल्या शाळेला भेट देण्याचे आवाहन केले होते. तसेच मुख्याध्यापक आणि शिक्षकांशी संवाद साधून शाळेच्या गरजा जाणून घ्याव्यात आणि आपल्या क्षमतेनुसार शाळेच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले होते. या आवाहनाला माजी विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळांना स्मार्ट टीव्ही, टॅबलेट, संगणक आणि विविध शैक्षणिक साहित्य भेट देऊन डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन दिले. काही माजी विद्यार्थ्यांनी शाळांचे रंगकाम, प्रवेशद्वार, किचन शेड तसेच इतर मूलभूत सुविधांच्या विकासासाठी आर्थिक व वस्तुरूपाने मदत केली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी मार्गदर्शन, तसेच क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्याचाही उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमातून केवळ शाळांना आर्थिक किंवा भौतिक मदत मिळाली असे नाही, तर माजी विद्यार्थी आणि शाळा यांच्यातील नातेही अधिक दृढ झाले आहे. योगदानाची रक्कम किती मोठी आहे, यापेक्षा ज्या शाळेने आपले आयुष्य घडवले, त्या शाळेसाठी काहीतरी करण्याची भावना अधिक महत्त्वाची असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.
आपल्या शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र यावे, आपल्या गावातील शैक्षणिक प्रगतीला हातभार लावावा आणि पुढील पिढीला अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.